बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो, व्हिडीओ किंवा ट्विट्सच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी अनुपम खेर चक्क किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनमुळे चर्चेत आहेत. मायकलसोबतचा एक फोटो पोस्ट करुन त्यांनी काही जुन्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला आहे.
अवश्य पाहा – चित्रपटांची होम डिलिव्हरी; हे ‘सात’ चित्रपट प्रदर्शित होणार हॉटस्टारवर
काय म्हणाले अनुपम खेर?
“हा फोटो १९९६चा आहे. त्यावेळी मायकल जॅक्सन भारतात आला होता. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन करुन त्याचं स्वागत केलं गेलं. सुदैवाने त्या पार्टीला मी देखील हजर होतो. एका लहानशा स्टेजवर उभं राहून मायकल सर्वांचं अभिवादन स्विकारत होता. त्यावेळी मला राहावलं नाही. मी थेट बॅरिकेट्स तोडून मायकलजवळ पोहोचलो पण तेवढ्यात त्याच्या सुरक्षारक्षकांनी मला अडवलं. त्यावेळी भारत भाईंनी मायकल जॅक्सनशी माझी भेट करवून दिली होती. मायकलने माझ्यासोबत शेकहँड केलं. आजही हा फोटो पाहिल्यावर ती घटना डोळ्यांसमोर उभी राहाते.” अशा आशयाची पोस्ट लिहून अनुपम खेर यांनी मायकलसोबतचा आपला अनुभव सांगितला आहे.
अनुपम खेर यांनी पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मायकल जॅक्सनचे चाहते जितके पाश्चिमात्य देशांमध्ये आहेत तितकेच भारतातही आहेत. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.