सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर चर्चेत आहेत. या चर्चा त्यांनी ‘कुछ भी हो सकता है’ हे नाटक आपल्या नवीन वेबसाइटवर प्रदर्शित केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. फिरोज अब्बास खान दिग्दर्शित ‘कुछ भी हो सकता है’ या नाटकामध्ये अनुपम खेर यांच्या जीवनात आलेले अपयश, यश तसेच काही कठिण प्रसंगांबद्दल सांगताना दिसत आहेत. नुकताच अनुपम यांनी या नाटकाचा एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांनी अभिनेते दिलीप कुमार यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. दिलीप कुमार साहेबांशी माझी पहिली ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. तेव्हा मी माझ्या मित्राच्या मदतीने तेथे प्रवेश मिळवला होता. समोरुन पाहिलं तर दिलीप कुमार येत होते. मी त्यांच्याजवळ गेलो. मी त्यांना नमस्कार केला. त्यांना वाटलं मी त्यांच्या ओळखीचा एखादा जुना व्यक्ती आहे’ असे अनुपम यांनी म्हटले.

‘त्यानंतर दिलीप कुमार यांनी अरे तु कुठे असतोस. किती दिवसांनंतर दिसतोयस असे म्हटले. मी म्हटलं मी इथेच रहातो. मी देखील त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न नाही केला. ती आमची पहिली भेट होती. त्यानंतर चित्रपट कर्माच्या सेटवर माझी दुसऱ्यांदा त्यांच्याशी भेट झाली. सुभाष घई यांनी मला डॉक्टर डँग म्हणून त्यांच्या समोर उभे केले’ असे अनुपम खेर यांनी पुढे म्हटले आहे.

अनुपम यांच्या हा नाटकातील छोटासा भाग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या दिलीप कुमार यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.