बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या निर्मितीत बनलेला ‘फिल्लौरी’ काल सर्वत्र प्रदर्शित झाला. एनएच १० नंतर अनुष्काने निर्मिती केलेला हा दुसरा चित्रपट. ‘फिल्लौरी’ मध्ये भूताची भूमिका साकारणाऱ्या अनुष्काने चित्रपटाची प्रसिद्धीही हटके अंदाजात केली होती. #ShashiWasThere या हॅशटॅगने तिने अमेरिकेतील ऑस्कर पुरस्कारासह आमिर खानच्या ‘लगान’मधील सामना विजयावेळी शशीचे भूत तेथे असल्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. तिच्या या हटके प्रसिद्धीमुळे या चित्रपटाची सोशल मिडीयावरही चांगलीच हवा निर्माण झाली होती. त्यामुळे तिचा हा फंडा बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. याचे उत्तर आता मिळाले असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने फारशी चांगली कमाई न केल्याचे चित्र आहे.

प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या ‘फिल्लौरी’ने पहिल्या दिवशी केवळ चार कोटींची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘फिल्लौरी’च्या कमाईचा आकडा ट्विट केला आहे. ‘फिल्लौरीला बॉक्स ऑफिसवर ठीकठाक प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने ४.०२ कोटींची कमाई केली आहे. आठवड्याअखेर कमाईमध्ये चांगल्या प्रदर्शनासाठी शनिवार आणि रविवारी चित्रपटाला अधिकाधिक प्रतिसाद मिळण्याची गरज आहे,’ असे तरण यांनी ट्विट करत म्हटले.

साहिबा आणि मिर्झाची दास्ताँ-ए-इश्क कधी गाण्यातून, कधी कवितांतून सांगत त्यात रंगून जाणारा पंजाब प्रांत. स्वातंत्र्यपूर्वकाळातील पंजाबची माहोल, तिथले लोकगीत-लोकसंगीत यांचा पुरेपूर वापर करत एक कवयित्री आणि गायक यांच्या प्रेमाची कथा सांगणारा ‘फिल्लौरी’ हा चित्रपट आहे. दरम्यान प्रदर्शनापूर्वी अनुष्काच्या या चित्रपटाची निर्मिती तिचा प्रियकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केल्याची जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चेला अनुष्काने तिच्या अंदाजात उत्तर दिले होते. मी माझ्या चित्रपटाची निर्मिती करण्यास सक्षम असल्याचे सांगत तिने विराटचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते.

‘फिल्लौरी’मध्ये अनुष्का शर्मा, पंजाबी अभिनेता, गायक दिलजित दोसांज, ‘लाइफ ऑफ पाय’मध्ये झळकलेला सूरज शर्मा आणि मेहरीन पिरजादा यांच्या भूमिका आहेत. अन्शै लाल या नव्या दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले असून अनुष्काच्या क्लीन स्लेट फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओने संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे.