कुटुंबसंस्था, एकत्रित कुटुंब, त्यातील निरनिराळ्या पिढय़ांमधील व्यक्तींचा एकमेकांशी असलेला संघर्ष, प्रत्येकाची तऱ्हा वेगळी असणं यांसारख्या गोष्टी यापूर्वीही रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांनी अनेकदा पाहिल्या आहेत. एकत्रित मोठय़ा कुटुंबात अचानक एक नवीन माणूस दाखल झाल्यावर होणारी गंमत हेही अनेकदा सिनेमांतून प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. मात्र केवळ ‘जनरेशन गॅप’ एवढेच न दाखविता एकत्र कुटुंबातील प्रत्येक पिढीतील व्यक्तींचे कुटुंब म्हणून एकमेकांशी किंचित संघर्ष असतानाही प्रत्येकाला एकत्र कुटुंबाचा अभिमान वाटणे, एकत्रित राहण्याची ओढ दाखविणारा, एकमेकांबद्दलचे प्रेम अतिशय सूक्ष्मपणे दाखवत तीन पिढय़ांच्या बदलाची गोष्ट सांगण्याचा प्रभावी, संवेदनशील आणि दमदार प्रयत्न दिग्दर्शकाने ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमातून केला आहे.

दिग्दर्शकाची जबरदस्त पकड असलेला हा सिनेमा आहे. अप्रतिम सादरीकरणातून प्रत्येक व्यक्तिरेखेच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे सोप्या कमीत कमी वेळात उलगडून दाखवत दिग्दर्शकाने पिढीच्या बदलाची ही नेटकी इमारत उभी केली आहे. उत्तम सादरीकरणातून भाष्य करण्याचा प्रयत्न करीत रंजनमूल्यही टिकवत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सिनेमा केला आहे.

प्रत्येक काळातील पिढी त्या त्या काळानुसार वागत, जगत असते. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमात शीर्षकानुसारच  ्नराजवाडे हे सोन्याच्या दागिन्यांचे मोठे व्यापारी कुटुंब आहे. रमेशराव राजवाडे हे कुटुंबप्रमुख, त्यांची पत्नी, दोन मुलगे, त्यांची बायकामुले, रमेशरावांची मुलगी, घरजावई आणि त्यांची दोन मुले असे भलेमोठे पुण्यातील कुटुंब आहे. सगळेजण राजवाडे अ‍ॅण्ड सन्सच्या उद्योगात आहेत. किंबहुना नोकरी करायची नाही, आपल्याच व्यवसायात प्रत्येकाने काम करायचे असा जणू रमेशराव यांचा कुटुंबप्रमुख म्हणून हट्ट आहे. राजवाडे कुटुंबाचा पुण्यातील वाडा पाडून आता तिथे टोलेजंग इमारत उभी राहणार आहे. म्हणून राजवाडे कुटुंब तात्पुरते पुणे शहरातील एका इमारतीत राहायला जातात. एकाच इमारतीत प्रत्येक मजल्यावर एकेक कुटुंब राहतेय. या सिनेमातील राजवाडे कुटुंबाच्या तीन पिढय़ांची गोष्ट सांगण्यासाठी ही एक इमारत हाही एक महत्त्वाचा मुद्दा बनून राहतो.

रमेशराव आणि त्यांची पत्नी ही एक पिढी, त्यांची दोन मुले विद्याधर आणि शुभंकर आणि त्यांच्या बायका तसेच मुलगी लक्ष्मी  व तिचा घरजावई नवरा ही दुसरी पिढी आणि तीन दाम्पत्यांची मिळून पाच मुलेमुली ही तिसरी पिढी अशा तीन पिढय़ांमधील ताणेबाणे दाखविण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, वागण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा, पेहराव, विचार करण्याची पद्धती  अशा अनेक गोष्टी अतिशय नेमक्या पद्धतीने दाखविण्याचा उत्तम दिग्दर्शनातून केला आहे.

हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना ‘खूबसूरत’ सिनेमाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही. मात्र ‘खूबसूरत’ किंवा तत्सम अनेक सिनेमांहून अतिशय निराळे आणि वैशिष्टय़पूर्ण मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. आजच्या काळातील राजवाडे कुटुंब दाखविले असून या कुटुंबातीलच एक पण कुटुंब सोडून दूर गेलेला एक जण न कळविताच कुटुंबात येतो आणि मग काय गमतीजमती घडतात त्याभोवती सिनेमा फिरतो.

कुटुंबप्रमुख रमेशराव राजवाडे ही भूमिका सतीश आळेकर यांनी अप्रतिम सादर केली आहे. सर्वच दिग्गज कलावंत यात असले तरी दिग्दर्शकाने कुणाचीही व्यक्तिरेखा अधिक वरचढ ठरणार नाही अशा रीतीने व्यक्तिरेखांचे लेखन केले आहे. अतुल कुलकर्णी यांच्या व्यक्तिरेखेचे दोन निराळे पैलु आणि ते सहज अभिनयातून उलगडून दाखविण्याचा त्यांचा प्रयत्नही अप्रतिम आहे. सचिन खेडेकर यांनी साकारलेला विद्याधर राजवाडे, मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेली लक्ष्मी यातून त्यांच्या व्यक्तिरेखांच्या निरनिराळ्या छटा सुंदर पद्धतीने दाखविल्या आहेत. उत्तम सादरीकरणाबरोबरच सर्वच कलावंतांचा अतिशय उत्कृष्ट अभिनय, सिनेमाला पूरक असे आणि एवढेच संगीत, पाश्र्वसंगीत, उत्तम छायालेखन याची जोड मिळाल्याने प्रेक्षकांना माहीत असलेला विषय निराळ्या कोनांतून दाखविणारा ‘फ्रेश लूक’ असलेला हा सिनेमा आहे.

राजवाडे अ‍ॅण्ड सन्स

निर्माते – यशवंत देवस्थळी, अतुल कुलकर्णी, सचिन कुंडलकर

दिग्दर्शक – सचिन कुंडलकर

कथा-पटकथा-संवाद – सचिन कुंडलकर

छायालेखक – अर्जुन सोरटे

संकलक – अभिजीत देशपांडे

संगीत – देबार्पितो, एड्रियन डिसुझा, तेजस मोडक

गीत, कविता – तेजस मोडक

कलावंत – अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, मृण्मयी गोडबोले, अमित्रीयान पाटील, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे, आलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, कृतिका देव, सुहानी धडफळे व अन्य.