देशात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या अटी हळूहळू शिथील केल्या जात असल्या तरी पूर्ण परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे ‘गरज नसताना घराबाहेर पडू नका’, असं आवाहन वारंवार पोलीस करत आहेत. यामध्ये आसाम पोलिसांनी केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत येत आहे. आसाम पोलिसांनी अभिनेता शाहरुख खानच्या आयकॉनिक पोझचा वापर करत सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

शाहरुखचा आयकॉनिक पोझमधील फोटो शेअर करत आसामा पोलिसांनी एक ट्विट शेअर केलं आहे. “सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं तर नक्कीच आपण सुरक्षित राहु शकतो. जसं शाहरुख म्हणतो, ‘कभी कभी पास आने के लिए कुछ दूर जाना पडता है, और दूर जाकर पास आने वालों को बाजीगर कहते है’, एकमेकांपासून सहा फुटांचं अंतर ठेवा आणि बाजीगर व्हा”, असं ट्विट आसाम पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, सध्या आसाम पोलिसांचं हे ट्विट चांगलंच चर्चिलं जात आहे. विशेष म्हणजे अनेकांनी हे ट्विट रिट्विट केल्याचंही पाहायला मिळत आहे.