नायकाची भूमिका मिळणे हेच आश्यर्य -प्रणव रावराणे

ऑटोमोबाइल इंजिनीअर असलेला अभिनेता प्रणव रावराणे चित्रपटात छोटय़ामोठय़ा भूमिका करत असतानाच ‘दुनियादारी’ चित्रपटातील सॉरीच्या भूमिकेने त्याला लोकप्रिय केले. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकात अभिनय केलेला अभिनेता आता वसंतराव खाटमोडेच्या भूमिकेत दिसणार आहे. सहकलाकार, नायकाचा मित्र अशाच भूमिका आजवर साकारल्या असल्याने तेच ऐकायची सवय होती.  त्यामुळे ‘आटपाडी नाइट्स’साठी नायकाच्या भूमिकेची विचारणा झाली तेव्हा आश्चर्यच वाटले, असं प्रवणने सांगितलं.  संजय सुपेकर यांनी मला चित्रपटाची कथा वाचण्यासाठी पुण्यात बोलावले. कथा वाचल्यावर मला नायकाला मदत करणारा मित्र अथवा भावाची भूमिका देणार असंच वाटत होतं. आतापर्यंत सहकलाकाराची भूमिका करण्याची सवय झाल्याने मी नायकाची भूमिका करणार यावर विश्वासच बसला नाही. अत्यंत गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा आहे. नवोदित कलाकारांना लगेच कामं मिळत नाही. सुरुवातीच्या काळात उत्तम काम केल्यास त्याची दखल घेऊन दुसरे मिळेल याच विचाराने काम केले पाहिजे, असं प्रणवने सांगितलं.

‘आटपाडी’ची कथा कुठेही घडू शकते    

-नितीन सुपेकर, दिग्दर्शक

पेशाने लेखक असलेल्या नितीन सुपेकर यांनी २०१६ मध्ये ‘वेल डन भाल्या’ या नाटकाचे लेखन केले होते. त्यानंतर स्मिता गोंदकर आणि अभिजीत खांडकेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भय’ या चित्रपटाची कथा त्यांनी लिहिली. ‘आटपाडी नाइट्स’साठी प्रथमच नितीन सुपेकर यांनी दिग्दर्शन, संवाद आणि पटकथेची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाच्या नावाबद्दल सांगताना, चित्रपटाचे नाव वेगळे असावे याकडे माझा कटाक्ष असतो. आधीच्या कोकणी चित्रपटात ‘बडे अब्बू’ हे नावही विचारपूर्वक ठरवण्यात आले होते, असे सांगतानाच आपल्यावर अरेबियन नाइट्स या कथासंग्रहाचा खूप प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटातली कथा ही रात्रीतच घडणारी असल्याने ‘नाइट्स’ हा शब्द निश्चित केला. दुसऱ्या शब्दासाठी आमचा शोध सुरू झाला. राज्यातील सर्व शहरांच्या नावांचा यासाठी विचार करण्यात आला. माझे एक नातेवाईक आटपाडीला राहात असल्याने त्यांनी एकदा जेवणासाठी बोलावले होते.  मी नातेवाईकांकडे जेवायला गेलो नाही, मात्र सहकाऱ्यांबरोबर चर्चेअंती ‘आटपाडी’ हे नाव आमच्या चित्रपटाला लागले, असं त्यांनी सांगितलं. चित्रपटाच्या पूर्वार्धात वश्या आणि हरिप्रियाच्या लग्नाची तर उत्तरार्धात लग्नांनतरची गोष्ट पडद्यावर मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने प्रणव, सायली, संजय कुलकर्णी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगळा होता. चित्रपटासाठी विनोदाची असलेली जाण, प्रेक्षकांशी परिचित चेहरा या दोन गोष्टींना प्राधान्य देत सायली आणि प्रणवची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. आताच्या काळात चित्रपटाच्या अभिनय, संकलन, छायाचित्रण, प्रकाशयोजना, संगीत, या विविध अंगांचा अभ्यास होऊ लागला आहे, असे सांगतानाच अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा फायदाही चित्रपट करताना झाल्याचे सुपेकर यांनी सांगितले.

वश्याच्या वडिलांची भूमिका विशेष -संजय कुलकर्णी

‘आटपाडी नाइट्स’ या चित्रपटात अभिनेता संजय कुलकर्णी यांनी वश्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. बापूसाहेब खाटमोडे ही भूमिका मनापासून जगलो असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. वश्याचे वडील बापूसाहेब हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील वडिलांप्रमाणे आहेत.   शब्दचातुर्य आणि बुद्धी या दोन गोष्टींच्या जोरावर ते बाजी मारतात. चित्रपटातील काही कथा या अंगणातून, स्वयंपाकघरातून येतात. ही कथा शयनगृहातून आली आहे, असं त्यांनी सांगितलं.  आपल्या भूमिकेविषयी बोलताना मराठी चित्रपटसृष्टीतील एकंदर परिस्थतीविषयीही संजय कुलकर्णी यांनी आपले निरीक्षण नोंदवले. ‘श्वास’नंतर मराठी चित्रपटाने आशयाच्या बाबतीत खरोखरच कात टाकलेली आहे. दरवर्षी विविध विषयांचे चित्रपट प्रदर्शित होत असून नवीन प्रयोग के ले जात आहेत. आधीच्या आणि आताच्या चित्रपटात मोठा तांत्रिक बदल झालेला जाणवतो. चित्रपट, मालिका आणि नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमाच्या या बदलामुळे कलाकारही घराघरात पोहोचला आहे आणि त्यामुळे आशयही बदलण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी चित्रपटात शहरी लोकांची मक्तेदारी दिसून येत होती, परंतु सध्याच्या काळात ग्रामीण भागातूनही नवीन तंत्रज्ञ, कलाकार आणि दिग्दर्शक यांना ओळख मिळते आहे, असेही त्यांनी सांगितले.

आजही अभिनय क्षेत्रात चित्रपटाला वेगळेच ग्लॅमर आहे. एका यशस्वी चित्रपटामुळे कलाकाराची वेगळी ओळख निर्माण होते. जुन्या चित्रपटातील संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट आणि मालिका हे जतन होत असल्याने अनेक वर्षांनंतरही पाहता येते. त्यामुळे या माध्यमांमध्ये काम करणे कलाकारांसाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिनय क्षेत्रात येताना कलाकाराने अपमान सहन करण्याची तयारी आणि सकारात्मकता या दोन गोष्टी अंगी बाळगल्या पाहिजेत. संघर्षांच्या काळात माणूस कसा वागतो, विचार करतो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असा सल्लाही त्यांनी नवोदित कलाकारांना दिला.

कलाकाराने संयमी असले पाहिजे -सायली संजीव

झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील  गौरीच्या भूमिकेने अभिनेत्री सायली संजीव घराघरांत पोहोचली. ‘पोलीस लाइन’ आणि ‘सातारचा सलमान’ केल्यानंतर ‘गुलमोहर’ या मालिकेत मी जी भूमिको केली त्याचे कौतुक झाले. त्यानंतर मी ‘आटपाडी नाइट्स’मध्ये हरिप्रिया ही प्रमुख भूमिका साकारली. ‘पोलीस लाइन’ चित्रपटात मी प्रणव रावराणेबरोबर एकत्र काम केलं होतं.  त्याच्या कामाची पद्धत, त्याचा स्वभाव मला माहिती होता. त्यामुळे काम करताना अत्यंत मजा आली असल्याचे तिने सांगितलं. हरिप्रिया ही मुलगी छोटय़ा गावातील असून तिचे भावविश्व नवऱ्याभोवतीच फिरते. हरिप्रियात मला गोडवा जाणवला जो ग्रामीण भागातील मुलींमध्ये आढळून येतो, असे सांगतानाच नाशिकवरून मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळातील संघर्षांतील दिवसाच्या आठवणींना सायलीने उजाळा दिला. नवोदित कलाकाराकडे कधी काम नसते तर कधी वर्षांचे ३६५ दिवसांत कामातच व्यग्र असतात. अशा परिस्थतीत कलाकाराने संयमी असणे गरजेचे आहे. सुबोध भावे मला चित्रपटाच्या निवड आणि अभिनयाबाबत सतत मार्गदर्शन करतात. तेव्हा त्यांनी एकदा सांगितलं की कलाकाराने काम करताना विशिष्ट काम स्विकारू नये. जे काम त्याच्या वाटय़ाला येईल ते त्याने प्रामाणिक आणि चोख केले पाहिजे. एक कलाकार म्हणून वावरताना नवीन काम स्वीकारणे आणि स्वत:ला सिद्ध करणे हा अनुभव आव्हानात्मक असल्याचेही सायलीने सांगितले.

मराठी चित्रपट पाहणे आवश्यक

*   मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले असले तरीही प्राइम टाइमसाठी झगडा सुरू असलेला दिसतो. त्यामुळे दोन-तीन आठवडय़ांनंतर चित्रपटगृहातून चित्रपट गायब झालेला दिसून येतो. एकाच महिन्यात चार ते पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने थिएटरही वाटले जातात. त्यामुळे पाचही चित्रपटांना प्राइम टाइम मिळणे शक्य नसते. मराठी चित्रपटसृष्टीत सर्वानी एकमेकांचे चित्रपट पाहणे आवश्यक आहे. तसेच त्याची प्रशंसाही केली पाहिजे, असे मत सायली संजीव हिने व्यक्त केले. मराठी चित्रपटसृष्टीचे आर्थिक गणित नफातोटय़ावर आधारलेले आहे. चित्रपटनिर्मिती हा एक व्यवसाय असल्याने प्रत्येक निर्माता यश-अपयशाचा विचार करणारच. आपण टाकलेले पैसे कसे परत मिळतील याचा विचार प्रत्येक निर्माता करतो. मराठी चित्रपटांनी नफा कमावण्यासाठी पैसेसुद्धा तेवढेच ओतले पाहिजे. आज प्रेक्षकही मराठीपेक्षा हिंदी चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात. प्रेक्षकांनीही मराठी चित्रपट जास्त पाहणे गरजेचे आहे. प्रेक्षकांनी जास्त मराठी चित्रपट पाहिल्यास थिएटर वितरकांनाही मराठी चित्रपट लावणे भाग पडेल, असेही संजय कुलकर्णी यांनी सांगितले.  मराठी चित्रपट हा शहरापुरताच मर्यादित राहिल्यासारखा वाटतो. कारण मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो मुंबई, पुणे, नाशिक या चित्रपटगृहांत जास्त लगलेला पाहण्यास मिळतो. ग्रामीण भागात पुरेशी चित्रपटगृहेसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आवडता चित्रपट प्रेक्षकांना पाहायचा असल्यास त्यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरी मराठी चित्रपट उपलब्ध असल्याने तेथे पाहता येतात, असे प्रवीण रावराणे याने सांगितले.

प्रेमाचा झांगडगुत्ता

*   समाजमाध्यमावर ‘प्रेमाचा झांगडगुत्ता’ हे गाणे प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. गाण्यातील ‘झांगडगुत्ता’ हा शब्द लोकांचे लक्ष वेधून घेतो आहे. हा शब्द विदर्भाकडील असून वाक्याप्रमाणे त्याचा संदर्भ बदलतो. पश्चिम महाराष्ट्रात एखादा गोंधळ अथवा भांडण झाल्यास हा शब्द वापरला जातो. अनेक दिवसांपूर्वी कवी नारायण पुरींची कविता माझ्या वाचनात आली होती. ही कविता नितीन सुपेकर यांना आवडल्याने त्यांनी याचे गाणे करण्याचे ठरवले. नारायण पुरी यांच्या परवानगीने कवितेत काही बदल करून गाण्याच्या ओळी लिहिल्या गेल्या आणि ते संगीतबद्ध केले.

वर्षांच्या शेवटी वेगळ्या विषयावरील नाटके आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. प्रवीण रावराणे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आटपाडी नाइट्स’ हा चित्रपटही अशापैकी एक म्हणता येईल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बंद दाराआडचा विषय रुपेरी पडद्यावर आला आहे, असे सांगणारे दिग्दर्शक नितीन सुपेकर आणि त्यांच्या चित्रपटातील मुख्य जोडीसह अभिनेता संजय कुलकर्णी यांच्याशी गप्पांदरम्यान या आटपाडी नाइट्समागची कथा उलगडली..