नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. नव्या गोष्टींचा आरंभ करतानाही काही जुन्या घडामोडी कायम लक्षात राहतात. सरत्या वर्षात मनोरंजन विश्वातही बऱ्याच घटना घडल्या. वर्षभरात सर्वाधिक गाजलेली गाणी, सर्वाधिक ट्रेण्ड झालेले व्हिडिओ याचा आढावा वर्षाअखेर आवर्जून घेतला जातो. अशाच प्रकारे गुगलनेही वर्षभरातील सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांची यादी बुधवारी जाहीर केली. यामध्येही पहिल्या १० ट्रेण्डिंग विषयांमध्ये मनोरंजन क्षेत्रच आघाडीवर आहे.

बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड्स मोडणारा आणि या वर्षी प्रेक्षकांची मनं जिंकणारा ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला. एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटानंतर त्याच्या सिक्वलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा प्रश्न अनेकांच्याच मनात खदखदत होता. अखेर यावर्षी जेव्हा त्याचा सिक्वल प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

वाचा : मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या ‘त्या’ प्रस्तावाला प्रभास होकार देणार का?

विशेष म्हणजे गुगलवर विविध भाषांमध्ये या चित्रपटाबद्दल सर्च केलं गेलं. यासोबतच बॉलिवूडच्या सहा चित्रपटांचा सर्वाधिक सर्च केलेल्या पहिल्या दहा विषयांमध्ये समावेश आहे. आमिर खानचा ‘दंगल’ आणि वरूण- आलियाचा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ यांविषयीदेखील गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं.

वाचा : विराट- अनुष्काच्या लग्नातील रणबीर कपूरचा फोटो पाहिलात का?

बॉलिवुड गाण्यांमध्ये अर्जुन कपूरच्या ‘मुबारका’ या चित्रपटातील ‘हवा हवा’ हे गाणं गुगलच्या टॉप ट्रेण्डिंगमध्ये अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ ‘बादशाहो’मधील ‘मेरे रश्के कमर’ हे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. मनोरंजनपाठोपाठ क्रिकेट विश्वातील घडामोडी गुगलवर या वर्षभरात सर्वाधिक सर्च केल्या गेल्या.