News Flash

कतरिनाची ‘कान’वारी

मे महिन्याचा मौसम उन्हाळ्याचा, आंब्यांचा आणि सुट्टय़ांचा असतो. पण चित्रपटप्रेमींसाठी हा मौसम अजून एका गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.

मे महिन्याचा मौसम उन्हाळ्याचा, आंब्यांचा आणि सुट्टय़ांचा असतो. पण चित्रपटप्रेमींसाठी हा मौसम अजून एका गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. फ्रान्सच्या ‘कान’ नगरीमध्ये दरवर्षी आयोजित होणाऱ्या या चित्रपट महोत्सवाला गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूड तारकांनी आवर्जून हजेरी लावायला सुरुवात केली आहे. या महोत्सवातील रेड कार्पेटवर झळकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. ऐश्वर्या राय बच्चनने पहिल्यांदा रेड कार्पेटवर पाय ठेवत या महोत्सवामध्ये बॉलीवूडच्या प्रवेशाची नांदी केल्यानंतर सोनम कपूर, फ्रिदा पिंटो, मल्लिका शेरावत अशा कित्येक बॉलीवूड तारकांनी या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे.
कान महोत्सवः ‘लेडी इन ब्लॅक’ कतरिना
यंदा ‘कान’च्या रेड कार्पेटवर कतरिना कैफच्या पहिल्यावहिल्या प्रवेशाबद्दल सर्वाना उत्सुकता होती. आतापर्यंत ऐश्वर्या, सोनम या बॉलीवूड सेलेब्रिटीजनी रेड कार्पेटवर आपल्या लुक्स आणि स्टाइलने तयार केलेल्या छबीला कायम ठेवत स्वत:ची नवी ओळख या रेड कार्पेटवर करण्याचे आव्हान कतरिनावर होते. या दोघींखेरीज अनेक बॉलीवूड नायिकांनी ‘कान’ला हजेरी लावली आहे. पण त्यांच्या उपस्थितीमध्ये सातत्य rv15नव्हते. ऐश्वर्या आणि सोनमने मात्र हे सातत्य कायम ठेवत बॉलीवूडचं प्रतिनिधित्व केलं आहे. यापुढे बॉलीवूडची ग्लॅमगर्ल म्हणून लौकिक मिळवणाऱ्या कतरिनाकडूनही सर्वाना हीच अपेक्षा असली तरी खुद्द कतरिनाने ‘कान’ला जाण्याआधीच आपण तिथे कुठल्याही प्रकारे फॅ शन स्टेटमेंट करण्यासाठी जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तिच्याबद्दलची उत्सुकता जास्तच वाढली होती.
२००२ मध्ये ऐश्वर्याने ‘कान’च्या प्रवेशासोबत भारतीय सेलेब्रिटीजच्या रेड कार्पेट लुक्सच्या जडणघडणीलासुद्धा सुरुवात झाली होती. गेल्या १४ वर्षांतील तिच्या ‘कान’मधील लुक्सवरून बॉलीवूड सेलेब्रिटीजची फॅशनमधील वाटचाल स्पष्ट दिसून येते. त्यामुळे ऐश्वर्याचं ‘कान’च्या रेड कार्पेटवर असणं एका अर्थाने महत्त्वाचं समजलं जातं. नीता लुल्लाच्या पिवळ्याधम्मक साडीपासून ते अरमानीच्या न्यूड स्ट्रेट फिट गाऊनपर्यंत ऐश्वर्याची स्टाइल रेड कार्पेटवर सुधारतच गेली. २०११मध्ये गरोदरपणानंतर तिची ‘कान’मधील कारकीर्द संपल्याचे सर्वानाच वाटले. पण त्यानंतरही तिने आपला रोब कायम ठेवला. ऐश्वयाने नेहमीच ‘कान’मध्ये तिच्या लुकमधील नजाकतता, राजशाहीपणा कायम ठेवला आहे. ‘कान’मध्ये फॅशन प्रयोग करण्यासाठी कधीही न घाबरणारी सोनम मात्र ऐश्वर्याच्या विरुद्ध आहे. जिथे ऐश्वर्याची स्टाइल १४ वर्षांमध्ये टप्प्याने घडत गेली, तिथेच सोनमने मात्र आपल्या पाच वर्षांमध्ये कुठेही ऐश्वर्या किंवा हॉलीवूडच्या इतर नायिकेची छबी दिसणार नाही, याची काळजी घेतली. सोनमची स्टाइल नेहमीच प्रयोगशील असते. त्यातही एखाद्या राजकन्येची छाप नेहमीच दिसून येते. कित्येकदा तिला कानच्या लुकबद्दल ‘सिंड्रेला’ही संबोधले गेले आहे.
कान चित्रपट महोत्सव २०१५: रेड कार्पेट
या सगळ्या पाश्र्वभूमीवर कतरिनाचे दोन दिवसांमधील लुक पाहता तिने या दोघींचीही छाप कुठेही दिसणार नाही, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला हे नक्की दिसून येतं. तिच्या लुकचा महत्त्वाचा भाग होता सध्या स्थिरावलेली आणि काळानुसार परिपक्व झालेली भारतीय फॅशन. त्यामुळे तिच्या लुकमध्ये स्थैर्य होते. कानला जाण्यापूर्वीच मी कोणतेही स्टाइल स्टेटमेंट सिद्ध करणार नाही. तर माझे व्यक्तिमत्त्व जसे आहे तसे ते प्रतिबिंबित करणाऱ्या कपडय़ांना माझी पसंती मिळेल. ‘कान’मध्ये कतरिना जशी आहे तशीच पाहायला मिळेल, असे तिने म्हटले होते. त्यानुसार र्बगडी रंगाचे केस हा तिच्या लुकचा मुख्य भाग होता. ‘एल्सा साब’चा लाल लेसचा गाऊन, काळा आणि पांढऱ्या रंगाचा स्ट्राईप्सचा ब्लाऊज आणि पेन्सिल स्कर्ट, ऑक्सर डे रेन्टाचा काळा स्ट्रॅपलेस गाऊन या तिन्ही लुक्समध्ये तिने साधा पण नजाकतदार लुक कायम ठेवला होता. कुठेतरी तिच्यावर ऐश्वर्याच्या लुकचा प्रभाव असल्याचे म्हटले गेले, पण ते तात्पुरतेच. त्यामुळे तिने आपल्या वेगळ्या लुकची छाप ‘कान’वर सोडली आहे. पुढच्या वर्षी काय? ही उत्सुकताही तिने यंदाच्या लुकमधून कायम ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 12:18 pm

Web Title: cannes 2015 katrina kaif is ravishing in red on day 2
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 ‘गोष्ट तशी गमतीची’चा कृतज्ञता व आनंद सोहळा
2 पाहा: स्वप्नील आणि मुक्ताच्या ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ चे नवीन पोस्टर
3 सनी लिओनीविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल
Just Now!
X