चित्रपट : कमांडो २

‘कमांडो २ : ब्लॅकमनी ट्रेल’ नावाने आलेला हा सिक्वलपट पहिल्यापेक्षा वेगळा आणि अधिक प्रभावी असेल, अशी अपेक्षा होती. त्याला कारणेही तशीच आहेत. तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘कमांडो’बद्दल लोकांना फारशी उत्सूकता नव्हती मात्र पंजाबच्या पाश्र्वभूमीवर घडलेल्या पहिल्याच चित्रपटात जयदीप अहलावतने साकारलेला सणकी खलनायक आणि त्याला आपल्या सहज वाटतील अशा स्टंट्सने तोडणारा नायक म्हणून विद्युत जामवालला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. सिक्वलमध्ये विद्युतच्या अ‍ॅक्शनला तितकाच मोठा कॅ नव्हास देण्याचा प्रयत्न निर्माता-दिग्दर्शकाने केला असला तरी त्यासाठी तितकीच प्रभावी ठरेल, अशी पटकथा नसल्याने ‘कमांडो २’ हा जमवून आणल्यासारखा वाटतो.

कमांडो करणवीर सिंग डोग्रा (विद्युत जामवाल) पुन्हा आपल्याला भेटतो. यावेळी त्याची भूमिका बदलली आहे, तो ‘कमांडो’ नाही. अंडरकव्हर एजंट असलेल्या करणची या चित्रपटातील लढाई ही देशसेवेसाठी आहे. ‘कमांडो २’ची कथा भारत, बँकॉक, थायलंड, मलेशिया अशा देशांतून फिरते. विद्युतच्या स्टंट्सना आणि हिरोगिरीला वाव मिळावा त्यामुळे कथेच्या व्यापक भ्रमंतीला काळ्या पैशाच्या रॅकेटचा ‘हवाला’ देण्यात आला आहे. भारतातील उद्योजक, राजकारणी यांचा काळा पैसा मलेशियातून सांभाळणाऱ्या विकी चढ्ढाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र हा विकी चढ्ढा सतत रूप बदलत असल्याने आपण पकडला आहे तोच विकी आहे का?, याची पोलिसांनाही शाश्वती नाही. त्यामुळे मलेशियातून विकीला भारतात आणण्यासाठी एका खास टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या टास्क फोर्सवर संकटाचे सावट आहे कारण ज्या उद्योजकांचा पैसा या रॅकेटमध्ये गुंतला आहे त्यात गृहमंत्री लीला (शेफाली शाह) यांच्या मुलाचाही समावेश आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सूत्रे आपल्या हातात घेऊन आपल्या मर्जीतील पोलिस अधिकारी बख्तावर (फ्रेडी दारूवाला), हॅकर जफर आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट भावना रेड्डी (अदा शर्मा) यांची नियुक्ती केली आहे. यात शेवटच्या मिनिटाला करणचा प्रवेश होतो. मलेशियाला पोहोचलेला करण आणि त्याचा टास्क फोर्स विकीला पकडण्यात यशस्वी होतात की नाही?, याची कथा म्हणजे हा चित्रपट आहे.

‘कमांडो २’ची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे दिग्दर्शक देवेन भोजानी यांनी गाण्यांना पूर्णपणे फाटा दिला आहे. खरे म्हणजे चित्रपटात इशा गुप्ता आणि अदा शर्मा अशा दोन नायिका आहेत. शिवाय, दस्तुरखुद्द अ‍ॅक्शन आणि नृत्य दोन्ही कलेत पारंगत असलेला विद्युतसारखा हिरो असल्यानंतर नाच-गाण्यांचा मोह आवरणे म्हणजे धाडसच होते. पण इथे हा धाडसी निर्णय छोटय़ा पडद्यावर ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘सुमीत संभाल लेगा’ सारख्या विनोदी मालिकांचे दिग्दर्शन करून पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर दिग्दर्शक म्हणून खेळी करणाऱ्या देवेन भोजानी यांनी घेतला आहे हे विशेष नमूद करायला हवे. चित्रपटात गाणी नसल्यामुळे विद्युतची अ‍ॅक्शन हाच चित्रपट पेलून धरणारा खांब आहे मात्र असे असूनही त्याला अ‍ॅक्शन खेळण्यासाठी का होईना अधिक चांगल्या पटकथेची गरज होती. त्याऐवजी ठोकळेबाज फ ॉम्र्युलापट वापरण्यावर दिग्दर्शकाने भर दिला आहे. चित्रपटाच्या कथेत तर इतकी वळणे वळणे आहेत की अरे! हे मला कधीच लक्षात आले होते, असे प्रेक्षकाने म्हणायचा अवकाश.. लगेच समोरचे दृश्य बदलून दिग्दर्शकाने तुला काय वाटले, ते तसे नाही असे आहे म्हणत गमतीने खो करावा, असे सतत वाटत राहते. बरे या खो-खोच्या खेळाने चित्रपटाला उठाव आला असता किंवा त्यांचा पडद्यावरचा पाठशिवणीचा खेळ प्रभावी ठरला असता तर तेही मान्य झाले असते. मात्र तसे काहीही न होता चित्रपट शेवटाकडे जातो.

विद्युत जामवालने आपली अ‍ॅक्शनकला पुन्हा एकवार सिध्द केली आहे. मात्र, दुर्दैवाने त्याच्या व्यक्तिरेखेला उचलून धरावे, अशी कथाच नसल्याने त्याचे स्टंट्स कौतूकाने बघण्याशिवाय प्रेक्षकांकडे पर्याय राहत नाही. दोन नायिका आहेत पण गाणी नाहीत, त्यामुळे कथेत नाही तर गाण्यात जी प्रेमाची कसर भरून काढली जाते तीही इथे नाही. ब्रँडेड वस्तूंचा शौक असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अदा शर्मा वेगळी वाटते. तिच्या विनोदी भूमिकामुळे सतत पुढे पळत राहणाऱ्या कथेला थोडी विनोदाची झिलई मिळाली आहे. इशा गुप्ताला इथेही ‘ग्लॅम डॉल’ एवढय़ाच मर्यादित स्वरूपाचे काम आहे. फ्रेडी दारूवालाने बख्तियारची भूमिका प्रामाणिकपणे केली आहे. चित्रपटात शेफाली शाह, सतीश कौशिक, आदिल हुसैन अशी मंडळीही आहेत.  पुरेपूर मसाला भरलेला अ‍ॅक्शनपट म्हणून ‘कमांडो २’चा उल्लेख करावा लागेल. पण त्याचा प्रभावही तितकाच आहे हे मान्य करायला हवे.

कमांडो २

  • निर्माता – विपुल शाह
  • दिग्दर्शक देवेन भोजानी
  • कलाकार – विद्युत जामवाल, अदा शर्मा, इशा गुप्ता, फ्रेडी दारूवाला, शेफाली शाह, आदिल हुसैन, सतीश कौशिक.