विदेशी वाऱ्यातून वाहत आलेला करोना विषाणू प्रत्येक देशात मुक्कामाला राहिला आहे. जगभरातील विविध देशांनंतर आता भारताला आणि पर्यायाने महाराष्ट्रालाही करोनाचा विळखा बसतो आहे. करोना विषाणूचा फटका मनोरंजन विश्वालाही बसला आहे. अशातच या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मिती करण्यासाठी निर्मात्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. करोनाशी संबंधित चित्रपटाचे शीर्षक नोंदवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढउतार सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, यात ‘करोना प्यार है’ या शीर्षकाचाही समावेश आहे.

२००० मध्ये प्रदर्शित झालेला हृतिक रोशन व अमिषा पटेल यांचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट तुम्हाला माहितीच असेल. याच चित्रपटाची कथा पुढे नेत ‘करोना प्यार है’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इरॉस इंटरनॅशनल फिल्म्स’ने या नावाची नोंदणी केली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एक प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आणखी वाचा : ..म्हणून ‘या’ मराठी अभिनेत्रीला डॉक्टरांनी दिलं ‘करोना’ औषध

‘करोना प्यार है’ या व्यतिरिक्त ‘वुहान वेपन करोना’, ‘करोना द ब्लॅक डे’, ‘करोना द इमर्जन्सी’, ‘डेडली करोना’ यांसारख्या चित्रपटांच्या नावांची नोंदणी झालेली आहे. करोना विषाणूच्या भीतीने सध्या जरी बॉक्स ऑफिस बंद असलं तरी भविष्यात त्यावरच आधारित चित्रपट निर्मितीसाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनकडे करोनावर आधारित चित्रपटांच्या नावांची यादीच आली आहे.

जवळजवळ पंधरा दिवस चित्रपटगृहे बंद राहणार असल्याने सिने वितरक, निर्माते यांचे धाबे दणाणले आहे. मार्च महिन्यात प्रदर्शित होणारे इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक अशा अंदाजे वीस चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याने त्यांचे पुन:प्रदर्शन करण्यावाचून पर्याय नाही. करोनाच्या धास्तीमुळे कलाकारांचे परदेश आणि प्रसिद्धी दौरे, वेब मालिका आणि चित्रपटांचे प्रदर्शन, पुरस्कार सोहळे लांबणीवर टाकण्यात आले आहेत.