बॉलिवूडमधली मोस्ट हॅपनिंग कपल म्हणजे दीपिका आणि रणवीर दोघंही येत्या नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. १४- १५ असा दोन दिवस त्यांचा विवाहसोहळा रंगणार आहे. या लग्नानिमित्त दीप-वीरच्या कुटुंबियांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून लग्नाच्यापत्रिका देखील तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे या लग्नामध्ये बॉलिवूडमधील काही खास मंडळींना निमंत्रण पाठविण्यात आलं आहे.
दीपिका आणि रणवीरने डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिल्यामुळे या लग्नसोहळ्यात केवळ नातेवाईक आणि जवळच्या मित्रपरिवारालाच आमंत्रित करण्यात येणार आहे. तसंच या लग्नानंतर डिसेंबरमध्ये ते एक रिसेप्शनदेखील ठेवणार आहेत.
बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याला या लग्नासाठी निमंत्रण पाठविण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच अभिनेता अर्जुन कपूर आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहरला देखील आमंत्रित करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. ‘गोलमाल’ सीरिजचे दिग्दर्शक रोहित शेट्टीदेखील या लग्नात सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या रोहित शेट्टी त्याच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून या चित्रपटामध्ये रणवीर सिंग झळकणार आहे.
दरम्यान, ‘रामलीला’च्या सेटवरच दीपिका-रणवीर या दोघांचं सूत जुळलं होतं. त्यानंतर सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ -१५ नोव्हेंबर रोजी हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत