दहा वर्षांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर या दहा वर्षांत तिने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. आज सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिचं नाव अग्रस्थानी आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीने मिळवलेल्या या स्टारडमचाच फटका दीपिकाला बसला आहे. दिग्दर्शक मजिद मजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातील भूमिका तिने स्टारडममुळे गमावली.

‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातील तारा या भूमिकेसाठी मजिद मजिदी यांनी दीपिकाची निवड केली होती. यासाठी तिने ऑडीशनदेखील दिलं होतं. गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मजिदी म्हणाले की, ‘एखादा मोठा स्टार चित्रपटात असला की काही गोष्टी हाताळणे अवघड जाते. ती जेव्हा ऑडीशनसाठी आली होती, तेव्हाच लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांचा घोळकाच झाला होता.’

चाहत्यांच्या घोळक्यामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याने अखेर मजिदी यांनी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय घेतला. ‘समाजातून मी चित्रपटाचे विषय निवडतो आणि सर्वसामान्यांच्या गर्दीतून मी कलाकार निवडतो. नवोदित कलाकारांसोबत मी जास्त काम करतो. पण याचा अर्थ असा नाही की मला मोठ्या कलाकारांसोबत कामच करायचं नाहीये,’ असंही ते पुढे म्हणाले.

PHOTOS : ‘होणार सून…’ फेम पिंट्या अडकला लग्नाच्या बेडीत 

मजिदी यांचा ‘बियाँड द क्लाऊड्स’ हा इफ्फीत ओपनिंग चित्रपट म्हणून दाखवला गेला. यामध्ये मालविका मोहनन आणि शाहिद कपूरचा भाऊ इशार खत्तर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.