जान्हवी आणि इशान या नवोदित कलाकारांचा ‘धडक’ येत्या २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मराठीतील ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला ‘धडक’ पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे ‘सैराट’ हा चित्रपट हिंदी,मराठी अशा सर्व भाषिक प्रेक्षकांनी पाहिला आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी इशान-जान्हवीला धडकच्या दिग्दर्शकांनी मज्जाव केल्याचं ‘डीएनए’च्या एका मुलाखतीतून समोर आलं आहे.

‘धडक’ हा चित्रपट करण जोहरच्या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार झाला असून त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक खेतान यांनी लिलया पार पाडली आहे. या चित्रपटासंदर्भात नुकतचं शशांक खेतान यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला असून त्यांनीच इशान-जान्हवीला सैराट न पाहण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं.

धडकचं दिग्दर्शन करताना मी जान्हवी-इशानला मुद्दामच ‘सैराट’ न पाहण्याचा सल्ला दिला होता. कारण जर त्यांनी ‘सैराट’ पाहिला असता तर ‘धडक’मध्ये त्यांचा अभिनय मला हवा त्याप्रमाणे झाला नसता. कदाचित ते दोघं आर्ची आणि परश्या या पात्रांना नकळतपणे कॉपी करु लागले असते.त्यामुळे इशान-जान्हवीला धडकला न्याय देणं जमलं नसतं. त्यामुळेच मी या दोघांना ‘सैराट’ न पाहण्याचा सल्ला दिला होता, असं शशांक म्हणाले.

दरम्यान, धडक प्रदर्शित होण्यापूर्वीच इशान आणि जान्हवी लोकप्रिय झाले असून त्यांनी आतापासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं.