पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाने मोदींवरील वेब सीरिजवरही आक्षेप घेतला आहे. ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचे ऑनलाइन स्ट्रिमिंग थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने इरॉस नाऊ या डिजीटल प्लॅटफॉर्मला दिले आहेत. ही सीरिज ३ एप्रिल रोजी प्रदर्शित झाली होती. सीरिजच्या एकूण १० पैकी ५ भाग प्रदर्शित करण्यात आले होते.

ऑनलाइन स्ट्रीमिंग होणारे सर्व एपिसोड पुढील आदेशापर्यंत काढून टाकण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘निवडणुकांमध्ये सर्व पक्षांना समान संधी मिळायला हवी. निवडणुकीच्या काळात एखाद्या राजकीय नेत्याच्या आयुष्यावर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर चरित्रपट प्रदर्शित होता कामा नये,’ असं निरीक्षण आयोगाने नोंदवलं.

१२व्या वर्षापासून मोदींचे आयुष्य ते भारताचे पंतप्रधान बनण्याचा त्यांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. तर लेखन मिहीर भुटा आणि राधिका आनंद यांचे आहे. फैजल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर यांनी मोदींच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील भूमिका साकारल्या आहेत.

दुसरीकडे ‘पीएम नरेंद्र मोदी’ चरित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. याविरोधात आता निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बायोपिक बघितल्यानंतर त्याच अभिप्राय कळवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.