करोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे देशात लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. मात्र या लॉकडाउनचा परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रांवर पडला आहे. त्यातच चित्रपगृह, नाट्यगृहदेखील बंद असल्यामुळे अनेक चित्रपट तयार असूनदेखील त्यांचं प्रदर्शन लांबणीवर पडत आहे. त्यामुळेच अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग अवलंबला आहे. मात्र, ‘ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी शासनाकडून अनुदान मिळावं’, अशी मागणी प्लॅनेट मराठीचे संचालक अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहिले आहे.

मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अक्षय बर्दापूरकर यांनी पुढाकार घेऊन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ या स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची अनुदान योजना आहे. मात्र, या अनुदान योजनेमध्ये चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना अनुदान मिळेल अशी अट आहे. परंतु, करोना काळात चित्रपटगृह बंद असल्यामुळे अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. त्यामुळे अशा चित्रपटांना अनुदान मिळाले नाही. म्हणूनच अक्षय बर्दापूरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहिले आहे.

या पार्श्वभूमीवर करोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन खास बाब म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही अनुदान योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी बर्दापूरकर यांनी केली आहे.