दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली. त्यामुळे निर्मात्यांनी मालिका आणि कार्यक्रमांच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. अनेक मालिकांचे जयपूर, गोवा, दमण अशा ठिकाणी चित्रीकरण सुरु आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचे देखील गोव्यात चित्रीकरण सुरु आहे. दरम्यान गोव्यातील फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी चित्रीकरणाला विरोध दर्शवला आहे.

गोव्यातील मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरण सुरु असतानाच सरदेसाई तेथे आले आणि त्यांनी चित्रीकरणाला विरोध दर्शवला. चित्रीकरणामुळे त्या भागात करोना रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला.

‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या असून सर्व नियमांचे पालन करुन चित्रीकरण सुरु असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे सरदेसाईंनी सेटवर करोना नियमांचे पालन योग्य पद्धतीने केले जात नसल्याचा आरोप केला. दरम्यान या वादामध्ये गायक अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केली आणि तणाव निवळल्याचे सांगण्यात येत आहे.