पंधरा कलाकारांना शंभर दिवसांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र आणून रंगवला जाणारा हा खेळ लवकरच मराठीत सुरू होत आहे. मराठी बिग बॉसची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण कलाकार असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय ठरलेला हा रिअॅलिटी शो १५ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना अद्यापही स्पर्धकांची नावं गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. अशातच काही कलाकारांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेला लाडका अभिनेता देवदत्त नागेचंही नाव चर्चेत आहे.

या चर्चांसंदर्भात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने देवदत्तशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत खुलासा केला. ‘कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून मला सातत्याने विचारण्यात येत आहे. बिग बॉसच्या घरात मी स्पर्धक म्हणून सहभागी व्हावं यासाठी माझ्याकडे अनेकदा विचारणा करण्यात आली. मात्र काही कामांमध्ये व्यग्र असल्याने मी सध्या त्यांना होकार दिलेला नाही. पण ‘वाईल्ड कार्ड एण्ट्री’साठी त्यांनी पुन्हा एकदा विचारल्यास मी नक्की विचार करेन,’ असं त्याने स्पष्ट केलं.

वाचा : हा तर नेपोटिझमचा बाप, करणवर नेटकऱ्यांनी डागली तोफ 

देवदत्त नागेसोबतच चर्चा आहे ती ‘फू बाई फू’च्या पहिल्या पर्वाची विजेती, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारची. नेमके कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी होतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

उषा नाडकर्णी, विकास पाटील, पुष्कर जोग, राजेश श्रुंगारपुरे, रेशम टिपणीस, मेघा धाडे या कलाकारांच्या नावांची चर्चा असून येत्या रविवारपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. याचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून १५ एप्रिलपासून संध्या. ७ वाजता तसेच त्यानंतरचे भाग दर सोम. ते शनि. रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहेत.