बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. याव्यतिरिक्त कंगना नेहमीच भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करताना दिसते. देशात करोनाचे संक्रमण वाढत आहे. वेगाने होणाऱ्या करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, कंगनाने नरेंद्र मोदी यांना तिचा पाठिंबा असल्याचे दाखवण्यासाठी एक ट्विट केले आहे.

कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटवर तिची प्रतिक्रिया देत हे ट्विट केले आहे. “संपूर्ण जगात करोना व्हायरस विरोधातील सगळ्यात भयानक बायो वॉर सुरू आहे. परंतु सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात सर्वात महान आणि सामर्थ्यवान नेत्यांची ही परीक्षा असू शकते. देव तुमच्या बरोबर राहो. अंधाराचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल”, अशा आशयाचे ट्विट करत कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देत असल्याचे दाखवले
आहे.

जाणून घ्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते..

नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या सध्य परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती देत ट्विट केले होते. “सध्या वाढत असलेला करोना व्हायरसचा प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीकरणाच्या पैलूंवर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे आपण जसे केले त्याप्रमाणेच आपण यंदाही करोनाशी अधिक वेगाने आणि समन्वयाने यशस्वीरित्या लढा देऊ”, अशा आशायचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.

दरम्यान, या आधी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तर काल, सोनू सूद, अर्जुन रामपाल यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्या आधी आलिया भट्ट, रणबीर कपूर, अक्षय कुमार, गोविंदा, कार्तिक आर्यन सारख्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपटात २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे. या सोबत कंगना लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे चित्रपट घेऊन येणार आहे.