टीव्ही क्वीन एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये अनुराग बासुची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथानला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पार्थने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
पार्थने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्या’ असे त्याने म्हटले आहे.
पार्थने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. तसेच मुंबई महानगरपालिका आणि डॉक्टर त्याला मदत करत असल्याचे देखील त्याने म्हटले आहे.
पार्थ गेल्या काही दिवसांपासून ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेचे चित्रीकरण करत होता. या मालिकेत नुकताच मिस्टर बजाजच्या भूमिकेत करण पटेलची एण्ट्री झाली आहे. त्यामुळे करण देखील त्याची करोना चाचणी करुन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच पार्थला करोना झाल्याची माहिती समोर येताच मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. तो शूट करत असताना सेटवर जवळपास ३० लोक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सेटवर उपस्थित असलेल्या लोकांची देखील चाचणी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.