स्टँडअप कॉमेडियन कुणाल काम्राने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मनसेच्या एका नेत्याने यावर सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. त्यामुळे भविष्यात कुणाल राज यांची अगदी खास ठाकरी शैलीत मुलाखत घेताना दिसू शकतो.

महिना होत आला तरी राज्यामध्ये सत्ता कोणाची या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. राज यांनी विरोधात बसण्याची इच्छा व्यक्त केली होती अशी आठवण कुणाल काम्राने एक ट्विट करत नेटकऱ्यांना करुन दिली आहे. “महाराष्ट्रातील मतदारांनी मला प्रमुख विरोधीपक्ष म्हणून निवडूण द्यावे, असा प्रचार राज ठाकरेंनी केला होता. मात्र मतदारांनी राज यांना विरोधात बसवले नसले तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे हे एकमेव विरोधीपक्ष नेते असल्याचे चित्र दिसत आहे,” असं कुणालने ट्विट करुन म्हटलं आहे. इतकच नाही या ट्विटच्या शेवटी त्याने राज यांची मुलाखत घेण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. “मी खूपच महत्वकांशी भाष्य करत आहे मात्र राज ठाकरेंना पॉडकास्टवर बोलतं करायला आवडेल,” असंही त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कुणालच्या या ट्विटला हजारो ट्विपल्सने रिट्वीट केले आहे. इतकच नाही तर मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनीही यावर कमेंट करुन ‘का नाही?’ असं म्हटलं आहे. शिदोरे यांच्या या उत्तरामुळे भविष्यात राज ठाकरे कुणाल काम्राबरोबर पॉडकास्टमध्ये दिसण्याची शक्यता वाढल्याचे अनेकांनी शिदोरांच्या ट्विटला रिप्लाय करत म्हटले आहे. ‘तुम्हीच हे घडवून आणू शकता,’ असंही अनेकांनी शिदोरेंच्या ट्विटला रिप्लाय करताना म्हटलं आहे.

कुणाल काम्रा सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. मोदींविरोधातील विनोद आणि स्टँडअप कॉमेडीमुळे तो प्रकाशझोतात आला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्याने ‘मोदींना मत देऊ नका’ हे ट्विट पिन केलेलं पाहायला मिळलं होतं.

विरोधक म्हणून निवडूण द्या…

विधानसभेच्या प्रचारादरम्यान राज यांनी ‘एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून माझ्या उमेदवारांना निवडून द्या. ते तुमचे प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर अधिक सक्षमपणे मांडतील’ अशा भूमिकेमधून सभा घेतल्या होत्या. याचाच संदर्भ घेत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन विरोधीपक्ष होण्यासाठी राज्यात चढाओढ सुरु असल्याचा टोला लगावण्यात आला होता. “राज ठाकरे एक सक्षम विरोधी पक्षाची गरज काय बोलून दाखवली, आता तर सगळेच पक्ष विरोधात बसण्यात तयार झाले आहेत,” असा टोला मनसेने लगावला होता. आता राज्यातील हा सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटतो आणि खरोखरच राज कुणालबरोबर पॉडकास्टवर झळकतात का हे येणार काळच सांगेल.