चित्रपटांचे अनोखे विषय आणि ते विषय हाताळण्याची अनोखी पद्धत यामुळे हिंदी सिनेसृष्टीही मराठी चित्रपटांकडे गांभीर्याने पाहू लागली आहे. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख, जॉन अब्राहम असे अनेक हिंदी कलाकार मराठीत आवर्जुन काम करताना दिसतात. हिंदीतील आणखी एक हुकमी एक्का म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने मराठीत येण्यास सज्ज झाली आहे. ‘धकधक गर्ल’ निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असून ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती ती करणार आहे.

या चित्रपटात ‘व्हेंटिलेटर’ फेम राहुल पेठे आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिका साकारणार आहे. तीस वर्षे कॅमेरासमोर काम केल्यानंतर आता निर्मितीचा अनुभव घ्यावासा वाटतोय अशी प्रतिक्रिया माधुरीने दिली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही तिने यावेळी दिली.

वाचा : ‘अब इतना भी जुल्म ना करो’, बिग बींची ट्विटरला विनंती

योगेश विनायक जोशी याच्या लेखणीतून उतरलेल्या कथेला स्वप्नील जयकर दिग्दर्शित करणार आहे. ‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स प्रा. लि.’ या बॅनरअंतर्गत माधुरी सिनेमाची निर्मिती करणार आहे. तसेच नितीन वैद्य या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असतील. आता माधुरी सिनेमाची निर्मिती करणात म्हटल्यावर तिचीही या सिनेमात एखादी भूमिका असेल की नाही याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, यामध्ये भूमिका साकारणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. या चित्रपटात ती झळकणार नसली तरी तिची मुख्य भूमिका असलेला ‘बकेट लिस्ट’ हा मराठी चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.