प्रत्येक कथेला सुरुवात, मध्य आणि शेवट या पद्धतीने विचार करायची सवय आपल्याला जडलेली असते. एखाद्या कथेची मांडणी करताना या तिन्हीला वेगवेगळे पर्याय देत आता तुम्हीच ठरवा तुमचा निष्कर्ष.. असा खेळ दिग्दर्शक म्हणून रचणं महाकठीण. कित्येकदा रहस्यपटांमध्ये याचा वापर जास्त केला जातो. आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी कथाकथनाचा हा अनोखा प्रयोग उत्तमरीत्या मांडला आहे. त्याचा वापर करताना जितक्या प्रभावीपणे कथेतील पात्रांच्या चित्रणाला वाव द्यायला हवा तो दिला नसल्याने ‘चौर्य’चा विषय विचार करायला लावतो, पण मनाचा ठाव घेत नाही. कथामांडणीचा एक वेगळा प्रयोग इतपत तो मर्यादित राहतो.
देवावरच्या लोकांच्या अगाध (?) श्रद्धेभोवती उभी राहिलेली अर्थव्यवस्था, प्रसिद्ध देवस्थानांभोवतीचं राजकारण आणि समाजकारण गेले कित्येक र्वष लोकांच्या या तर्क नसलेल्या अगाध भक्तीवर पोसलं गेलं आहे. किंबहुना देवळातल्या देवाला त्या विटेवरच अडकवून ठेवत भक्तीच्या अर्थकारणाचे मोठमोठे इमले या देवळांभोवती उभे राहिलेत. हा विषय उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ चित्रपटात याआधी अगदी सविस्तरपणे आला आहे. ‘चौर्य’मध्ये हा विषय रहस्याच्या आधारे पुन्हा मांडला गेला आहे. या चित्रपटाची कथा ही अर्थातच शनी-शिंगणापूर या देवस्थानावरून प्रभावित झालेली आहे. देवमाळ या गावात कोणत्याही घराला दरवाजा नाही. या गावात चोरी होत नाही आणि चोरी झालीच तर गावाच्या वेशीबाहेर तो चोर जाऊ शकत नाही. तो तिथेच मरून पडतो, गावची संपत्ती वेशीबाहेर जात नाही, यावर गावक ऱ्यांची अतोनात श्रद्धा आहे. देवमाळमध्ये देवाच्या उत्सवाला लाखोंनी भाविक येतात आणि कोटय़वधींची संपत्ती ट्रस्टकडे जमा होते. वर्षांनुर्वष याच श्रद्धेवर बिनबोभाट कारभार सुरू असणाऱ्या या गावात ऐन उत्सवात देवाची दानपेटीच लुटली जाते. देवाचा उत्सव सुरू असतानाच पैसे मोजणाऱ्या ट्रस्टींना मारून, बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना ठार मारून दानपेटीतले धन लुटले जाते आणि देवमाळच्या श्रद्धेला पहिला तडा जातो. ही लूट कोणी केली? हेही सांगता येत नाही कारण चोरी करणाऱ्यांनी पोलिसांचे कपडे घातले आहेत. शिवाय, त्यांच्या चेहऱ्यावर अमिताभ, श्रीदेवी, अमरीश पुरी या चित्रपटांतील कलाकारांचे मुखवटे आहेत. खरं कोण या चोरांना शोधणारे पोलीस की पोलिसांच्या वेशातील चोर.. या कल्पनेचा सुरेख प्रतीकात्मक वापर दिग्दर्शकाने केला आहे.
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पातळीवर कथा घडते. एकीकडे देवमाळमध्ये चोरी झाल्यानंतर शोध कसा घ्यायचा या चिंतेत सापडलेले पोलीस आणि गुरूजी, त्यांच्यावर प्रसिद्धीमाध्यमांनी उठवलेली झोड, गावात त्यानंतर सुरू झालेली चर्चा.. ज्या गावात कधीच चोरी होणार नाही या विश्वासाने वर्षांनुर्वष दरवाजाच न लावणारे भाविक आहेत. तिथे देवाच्या नावावर कोटय़वधीचे व्यवहार होतात म्हटल्यावर सावधगिरी म्हणून का होईना कडी-कुलूपे लावायला हवीत, अशी भूमिका पोलिसांना घ्यावी लागते. पण लोकांची देवावरची श्रद्धा कमी होऊ नये आणि त्या अनुषंगाने होणारा अर्थकारणाचा कारभार कोलमडू नये म्हणून तशी भूमिका घेण्यास असमर्थ ठरणारे गुरूजी हा विषय कमीत कमी प्रसंगातून-संवादातून दिग्दर्शकाने प्रभावीपणे मांडला आहे. मात्र दुसरीकडे या कथेला रहस्याची जोड देण्यासाठी म्हणून माळरानावर ज्या व्यक्तिरेखांची जंत्री होते ती नीरस ठरते. सुरुवातीला दिसणारा पोलीस, त्यानंतर येणारी जीप, त्या जीपमधील दोन व्यक्तिरेखा ज्या स्वत:ला पोलीस म्हणवत आहेत पण त्या चोर असल्याचा संशय जास्त आहे, त्यांच्या मागोमाग येणारा तिसरा खरा (?) पोलीस या सगळ्यांच्या संवादातून निर्माण होणारा गोंधळ, त्यांचा देवमाळच्या चोरीसंदर्भातून येणारा भूतकाळ हे सगळं वेगळ्या तंत्राने दिग्दर्शकानं मांडलं असलं तरी या व्यक्तिरेखांचे चित्रण फारच तोकडे असल्याने त्या प्रेक्षकाला स्वत:शी जोडून घेत नाहीत. त्यांच्या ओळखीतून कथा पुढे सरकण्याआधीच दिग्दर्शक त्यांना मारून टाकतो. यामुळे रहस्य वाढण्यास मदत झाल्याचे वरवर भासत असले तरी चित्रपटावरची दिग्दर्शकाची पकड सैल होत जाते. आणि मग शेवटापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पुढे पुढे चित्रपट पाहात राहतो. प्रदीप वेलणकर, मिलिंद शिंदे आणि गणेश यादव हे तीनच परिचयाचे चेहरे सोडले तर अन्य सगळे कलाकार नवीन असूनही त्यांचा उत्तम अभिनय चित्रपटासाठी जमेची बाजू ठरते.
अशा पद्धतीने ऐन उत्सवात चोरी करणाऱ्या टोळीमागे मोठी व्यक्ती असणार हे गृहीत असल्याने त्यातले रहस्यही लवकरच संपुष्टात येते. त्यामुळे जो धक्का दिग्दर्शकाला अपेक्षित आहे तो बसत नाही. या चित्रपटाला रहस्यमय मांडणीचा तडका दिल्यानंतर किशोर कदम यांच्या रूपाने उपदेशाचा डोस पाजणारा जोड व्यर्थ ठरतो. एका वेगळ्या पद्धतीने कथेची मांडणी करताना त्यावर अधिक तपशिलात काम झाले असते तर ‘चौर्य’ जास्त प्रभावी ठरला असता.

चौर्य
निर्मिती – नवलखा आर्ट्स, साधना सिनेमा
दिग्दर्शन– समीर आशा पाटील
कलाकार – किशोर कदम, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, गणेश यादव, दिग्विजय रोहिदास, तीर्था मुरबाडकर, दिनेश शेट्टी, जयेश संघवी, आरजे श्रुती.