|| भक्ती परब

भाषा संवादाचा पूल जोडते. भाषेतून आपल्याला त्या त्या संस्कृतीची नव्याने ओळख होत राहते. जिथे परंपरा आणि नवता भाषेतून प्रभावीपणे व्यक्त होतात तिथे आपण आपसूकच ओढले जातो. सध्या प्रेक्षक मनोरंजनाच्या बाबतीत आपल्या प्रादेशिक भाषेला प्राधान्य देताना दिसत आहेत. तमिळ, कन्नड, तेलुगू, मराठी, बंगाली, मल्याळम आणि गुजराती अशा क्रमाने प्रादेशिक भाषांतील मालिका पाहण्याची पसंती दिसून येते आहे. प्रादेशिक भाषा किंवा बोलीभाषांचा मालिकेत नुसता वापर करून उपयोग नाही, तर त्या भाषेत भिजून जाण्याची अनुभूती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली तरच ती मालिका त्यांच्या मनात स्थान मिळवेल, यासाठी मराठी मालिकांना अजून प्रयत्न करावे लागणार आहेत.

प्रादेशिक वाहिन्यांवर काही मालिका मूळ हिंदी भाषेतील असतात. त्या डब करून या वाहिन्यांवर दाखवल्या जातात. तसेच काही प्रादेशिक वाहिन्या स्वत:हून काही मालिकांची निर्मिती करतात. या दोन्ही प्रकारांतील मालिका प्रेक्षकांना आवडतात. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि गुजराती या प्रादेशिक भाषांमधील मालिकांमध्ये शहरातला मुलगा आणि परंपरा, संस्कृती जपणारी गावाकडची मुलगी किंवा अनाथ मुलगी अशा आशयाचं कथानक बऱ्याचदा दिसतं. पण त्या तुलनेत मराठी भाषेतील मालिकांमध्ये वेगळेपण आहे. मराठी मालिकांमध्ये बोलीभाषांचाही चांगल्या प्रकारे वापर होतो आहे. पण तरीही त्या मनाला भिडत नाहीत, त्या बोलीभाषांमध्ये तिथल्या संस्कृतीचा ओलावा नसल्यामुळे सपक झाल्या आहेत.

‘कलर्स कन्नड’ या वाहिनीवरील ‘सीता वल्लभ’ या मालिकेतही श्रीमंत मुलगा आणि एका अनाथ मुलीची गोष्ट आहे. त्याला बालपणीच्या आठवणींची एक सुंदर किनार आहे. या मालिकेत कन्नड भाषेतील गोडवा अनुभवायला मिळतो. मालिकेमध्ये सर्व संवाद कन्नड भाषेतूनच असतात. एका दृश्यात फक्त तीन ते चार इंग्रजी शब्द ओघाने आले तर येतात. पण ते खटकण्याएवढे अजिबात नसतात. या मालिकेत होळी, गावाकडील दिवाळी, कन्नड संस्कृतीतील इतर छोटे सण उत्तमरीत्या दाखवण्यात आले आहेत. या मालिकेत होळीच्या एका दृश्यात पाश्र्वभूमीला एक कन्नड गाणं वाजवण्यात आलं होतं. त्या गाण्यामध्ये एका कडव्यात प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा जशी रंगांची होळी खेळतात, तशी आपली ही होळी, अशी अप्रतिम उपमा देण्यात आली होती. याउलट मराठी मालिकांमध्ये हिंदी गाण्यांवरच गुजराण केली जाते. नायक – नायिकेचे प्रेम दाखवतानाही पाश्र्वभूमीला मराठी मालिकांमध्ये हिंदी गाण्यांचाच वापर दिसतो. पण ‘सीता वल्लभ’सारख्या मालिकांमध्ये नायक – नायिकेच्या प्रेमाची दृश्ये दाखवताना कन्नड भाषेतील चित्रपटांमधीलच गाणी वापरली जातात. गणपतीच्या पूजेला दूर्वाचं महत्त्व सीता वल्लभामधील नायिका नायकाला गमतीशीर पद्धतीने सांगताना दिसते. मालिका अशा सांस्कृतिक दुवे सांधत साकार केल्यामुळे भाषेतील असा संवाद प्रेक्षकांना भावतो.

गेल्या काही वर्षांत मराठी भाषेतही मूळ मराठी भाषेबरोबरच मराठीच्या बोलींचा वापर असलेल्या मालिकांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं खरं. पण त्यातला बेगडीपणाही प्रेक्षकांच्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे मालवणी बोलीसहित इतर बोलींतील संवादावर अजूनही टीका होते. गावाकडचा नायक किंवा गावाडकची नायिका दाखवतानाच तिथल्या संस्कृतीचं चित्रण करण्यात मराठी मालिका मागे पडलेल्या दिसतात. दिवाळी, गुढीपाडवा आणि वटपौर्णिमा यापलीकडेही काही सण असतात. अगदी श्रावण महिन्याचा संदर्भ घेतला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा वेगवेगळ्या पटटय़ांत संस्कृतीमध्ये असलेली विविधता सध्याच्या गावरान मालिकांमध्ये दिसणे अपेक्षित आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘जीव झाला येडापिसा’, ‘झी मराठी’वरील ‘मिसेस मुख्यमंत्री’, ‘रात्रीस खेळ चाले२’ , ‘तुझ्यात जीव रंगला’ सारख्या मालिका अशा सांस्कृतिक आशयावर अधिक खुलवता आल्या असत्या. यापुढे ते दिसेल अशी अपेक्षा करूया.

‘झी टॉकीज’ वाहिनीवर प्रेक्षकांना अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या अभिनयाने परिपूर्ण असलेला ‘राक्षस’ चित्रपट रविवारी पाहता येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘भागो मोहन प्यारे’ आणि ‘अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी’ या मालिका ७ ऑगस्टपासून दाखल होत आहेत. ‘झी युवा’ वाहिनीवर ‘युवा सिंगर एक नंबर’ हा सांगीतिक कार्यक्रम ७ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ७ ते १० या वेळात दाखवण्यात येणाऱ्या मालिकांमध्ये अजून रंगतदारपणा यायला हवा. या आठवडय़ात ‘बिग बॉस’मध्ये घरात राहणाऱ्या सदस्यांना त्यांच्या घरची मंडळी भेटायला आली होती. त्यामुळे रंगत आली. भाषा किती महत्त्वाची असते आणि भाषेमुळे किती वादविवाद होतात हे गेल्या वर्षीच्या आणि आताच्या ‘बिग बॉस’मध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. एकूणच प्रादेशिक भाषांमध्ये मालिकेला बोलीभाषेची नुसती फोडणी देऊन चालणार नाही. तर त्या बोलीभाषेचा साज चढवायला हवा. भाषेचा प्रामाणिकपणे नुसता वापर आणि आग्रह धरणे अपेक्षित नसून त्या भाषेत सहज रंगून जाण्याची अनुभूती प्रेक्षकांना हवी आहे.