अ‍ॅमेझॉन प्राइमवर सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधल्या ‘बबलू पंडित’ची भूमिका करणारा अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आलाय. व्हिडीओमध्ये सबटायटल न दिल्याने ट्विटच्या माध्यमातून त्याने अ‍ॅमेझॉन प्राइमला चांगलंच घेरलंय. अभिनेता विक्रांतच्या या ट्विटने त्याच्या फॅन्सना आश्चर्यचकित करून सोडलंय. त्याने केलेल्या या प्रश्नावर त्याच्या फॅन्सनी पाठिंबा देखील दिला.

अभिनेता विक्रांत मेस्सीने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओला प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या व्हिडीओ कंटेटबद्दल त्यांना सल्ला दिलाय. यासाठी ट्विट करताना त्याने लिहिलं, “अ‍ॅमेझॉन प्राइमवर दुसऱ्या देशातील विदेशी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सबटायटल दिले तर आणखी उत्तम होईल. प्रेक्षकांना चित्रपट समजून घेण्यासाठी मदत होईल.” आश्चर्याची बाब म्हणजे इतका मोठा प्लॅटफॉर्म असून त्यांच्या अनुभवी टीममधून आतापर्यंत कोणीच यावर लक्ष घातलं नाही.

विक्रांतच्या या ट्विटची दखल घेत अ‍ॅमेझॉन हेल्पने यावर उत्तर दिलंय. विक्रांतने दिलेल्या सल्ल्याबाबत अ‍ॅमेझॉन प्राइमच्या टीमला सांगण्यात आलं असल्याचं त्यांनी यात सांगितलंय. तर दुसरीकडे विक्रांतने शेअर केलेल्या धमाकेदार ट्विटवर कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिलाय.

एका युजरने तर विक्रांतच्या या ट्विटची खिल्ली उडवत कमेंट केली आहे. यात त्याने लिहिलंय, “तुम्हाला हा सल्ला देण्यासाठी नेटफ्लिक्सने सांगितलं आहे का ?” त्याने दिलेल्या सल्ल्याला पाठिंबा देत आणखी एका युजरने लिहिलं, “व्हिडीओमध्ये सबटायटल दिल्याचा फायदा त्यांनाही होऊ शकतो जे ऐकू शकत नाहीत.” आणखी दुसऱ्या युजरने लिहिलं, “भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबटायटलवर आणखी काम करण्याची गरज आहे.” एका दुसऱ्या युजरने लिहिलं, “मला नाही वाटत की त्यांना हे माहित असेल…ते या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामागे काही विशेष कारण आहे का ?”

अभिनेता विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ‘छपाक’, ‘गिन्नी वेड्स सनी’ सारख्या चित्रपटात काम केलंय. गेल्याच वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सीमा पाहवा दिग्दर्शित ‘रामप्रसाद’ या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, सुप्रिया पाठक सारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका दिसून आल्या. विक्रांतने ‘१४ फेरे’ या व्यतिरिक्त संतोष सिवन यांची फिल्म ‘मुंबईकर’ मध्ये झळकणार आहे. यासोबत तो विजय सेतुपति, रणवीर शौरी, संजय मिश्रा, सचिन खेडेकर सारख्या अभिनेत्यांसोबत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.