||पंकज भोसले

मराठी भयकथांतील अव्वल शिलेदार नारायण धारप यांची ‘गुंतवण’ नावाची एक गोष्ट आहे. त्यातील निवेदकाला जुन्या वस्तूंच्या दुकानात एक शिसवी पेटी सापडते. त्या पेटीच्या चोरतळात पोथी आणि पाहता क्षणीच खुणावणारे कापड असते. निवेदकाचे परिचित या कापडावर लुब्ध होतात आणि आपल्या नव्या घरासाठी तंतोतंत तसेच कापड शिवण्याचा हट्ट धरतात. पण सापडलेल्या कापडाची नक्कल सुरू झाल्यापासून विपरीत आणि जीवघेण्या गोष्टींची मालिकाच सुरू व्हायला लागते. त्या कापडातील भुताळी ताकद लक्षात येईस्तोवर बराच उशीर झालेला असतो..  धारपांच्या बऱ्याचशा भयकल्पनांमध्ये सूक्ष्म परकीय धागे असले, तरी त्यांचे पूर्णाकृती रूप खास धारपांचा ठसा घेऊन उमटत असते. ‘गुंतवण’ ही अफाट गाजलेली गोष्ट नसली तरी त्यांच्या ‘थैलीतला खामरा’, ‘बळी’, ‘हिरवे फाटक’ यांसारख्या वाचकाला पकडून ठेवणाऱ्या भय-विचित्र कथांच्या परंपरेतील आहे.

What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..

एकोणीसशे चाळीसच्या दशकात अमेरिकी-ब्रिटिश पल्प मासिकांमधून बहरलेल्या विचित्र कथानकांनी जगभरातील भयलेखकांना प्रेरणा दिली. तर्काच्या कसोटीवर न उतरणारे अनेक घटक, समांतर विश्व, स्वप्नजगतासमान प्रदेश, अनाकलनीय बाबींना घेऊन या कथांची निर्मिती झाली होती. ‘विअर्ड टेल्स’ नावाचे एक मासिक या कथांना प्रसिद्धी देत होते. या आणि अशाचसारख्या मासिकांमधून सादर झालेल्या एच.पी.लव्हक्राफ्ट, सीबरी क्वीन, कॉर्नेल वुलरिच यांच्या विचित्र भय-भूतकथांची अनेक रूपे साहित्य आणि चित्रपटांमधून आजही वावरत आहेत. ‘इन फॅबरिक’ हा या वर्षीचा ब्रिटिश भयपट त्याच पंथात मोडतो. या चित्रपटात अंगावर काटा येणारे भय नाही किंवा हादरवून सोडणारी दृश्ये नाहीत. पीटर स्ट्रीकलण्ड या दिग्दर्शकाचा हा चित्रपट एका भुताळी वस्त्राशी संबंधित आहे. हे वस्त्र घालणाऱ्या व्यक्ती विशिष्ट चकव्यात अडकतात. वास्तव जगाच्या दृष्टीने त्यांचा अंत होत असला, तरी भलत्या विश्वात त्या वस्त्रनिर्मितीच्या फेऱ्यात सापडलेल्या दिसतात. ही नेहमीच्या वाटेने जाणारी भयचित्रकथा नाही. तिचा उद्देश घाबरवण्याऐवजी प्रेक्षकाला वेगळी दृश्य अनुभूती देण्याचा आहे.

चित्रपटाला आरंभ होतो, तो शीला (मॅरिअन जॉन बाप्टिस्ट) या उतारवयीन कृष्णवंशीय स्त्रीच्या रटाळ बनलेल्या आयुष्यापासून. बँकेत नोकरीला असलेल्या शीलाचा नवरा तिला सोडून गेला आहे. चित्रकार असलेला तिचा तरुण मुलगा घरात एका गोऱ्या तरुणीला सोबत राहण्यासाठी घेऊन आलेला आहे. त्यामुळे एकटेपणाची मात्रा अधिक असल्याने शीला पेपरमध्ये डेटिंग्जच्या जाहिराती पाहून वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असते. टीव्हीवर कपडय़ांचा भव्य सेल असलेल्या जाहिराती पाहून ती ड्रेस खरेदी करण्यासाठी त्या आवाढव्य दुकानात पोहोचते. तेथे मदत करण्यासाठी आलेली विक्रेती तिला लाल रंगाचा एक आकर्षक ड्रेस दाखविते. त्या ड्रेसची महती गात अशा प्रकारचा एकमेव ड्रेस संपूर्ण दालनात असल्याचा तपशीलही पुरविते. शीला हा ड्रेस परिधान करून आपल्या नव्या मित्राला भेटते. मात्र वस्त्र घातल्याच्या पहिल्याच दिवसापासून तिच्या आयुष्यात असाधारण बदल घडायला लागतात. तिच्या अंगावर भीषण व्रण उठण्यास सुरुवात होते, ऑफिसमधील वरिष्ठांचा कामांतील घटकांवरून जाच सुरू होतो, धुण्यासाठी टाकलेला तो ड्रेस संपूर्ण वॉशिंग मशीन बिघडवून टाकतो आणि ड्रेस टांगलेल्या कपाटामध्ये रात्री विचित्र आवाज येण्यास सुरुवात होते. शीला तो ड्रेस बदलून दुसरा मागण्यासाठी पुन्हा दुकानात दाखल होते. तेथे असलेल्या वस्त्रांच्या पुस्तिकेमध्ये हाच ड्रेस घातलेल्या मॉडेलचा अपघाती मृत्यू झाल्याचा तपशील तिला समजतो. मित्राच्या आग्रहास्तव हा ड्रेस घातलेला असताना पुढे एक अजस्र कुत्रा तिच्या अंगावर येऊन त्या ड्रेसच्या चिंध्या करतो. तरी दुसऱ्या दिवशी तो ड्रेस किंचितही न फाटलेल्या अवस्थेत घरामध्ये असल्याचे शीलाच्या लक्षात येते.

या ड्रेसच्या भुताळी कारवायांबाबत मित्राला सांगण्यासाठी निघालेल्या शीलाच्या गाडीचा वाटेत अपघाती मृत्यू होतो. अपघात झाल्यानंतर ड्रेस पुन्हा त्याच दुकानात विक्रीसाठी दाखल झालेला दिसतो. लग्न करण्यास निघालेल्या एका मशीन दुरुस्ती करणाऱ्या तरुणाच्या घरात दाखल होऊन हा ड्रेस नव्या जीवघेण्या कारवाया करण्यास सज्ज होतो.

इथली वस्त्राची कथा साधारण असली, तरी दिग्दर्शक त्यानिमित्ताने अनेक रंजक आणि कुतूहलपूर्ण दृश्यांना उभे करतो. कपडय़ांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांची ग्राहकांना आकर्षित करण्याची पद्धती, संपूर्ण शहरातील बायकांचे दुकान उघडण्याआधीपासून  खरेदीसाठी लोटणे, ग्राहकांकडून घेतलेले पैसे आणि त्यांची मोड विशिष्ट प्रकारच्या पाइप्समधून करण्याचा इथला प्रकार लक्षात राहण्यासारखा आहे. यांतील व्यक्तिरेखांमध्ये फार मोठा संवाद घडत नाही. बँकेतील कर्मचारी स्वप्नांवर आणि अतिखासगी बाबींबद्दल ऐकून घेण्यास तत्पर दिसतात. भुताळी ड्रेसची माहिती असलेल्या पुस्तिकेतील फाडलेल्या कागदाची सुरनळी लपवण्यासाठी यथोचित जागा शोधून काढलेली दिसते. साधारण तर्काच्या कसोटीवर उतरणाऱ्या बाबी आणि रहस्यभेदाची ओढ यांना वगळून इथला व्यवहार सुरू राहतो.

नारायण धारप यांनी लिहिलेल्या वैविध्यपूर्ण ‘भय-विचित्र कथा’ आजही ताज्या आहेत. त्या जातीच्या कथांमधील भयाच्या स्वतंत्र तर्कनियमांनुसार हा चित्रपट आणि त्यातल्या असामान्य वाटा दिसायला लागतात. पारंपरिक भीतिपटांच्या माऱ्याने संवेदना बोथट झाल्या असल्यास ही भुताळी वस्त्रकथा चवबदल देऊ शकेल.