मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. काही दिवसांपूर्वीच मितालीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे मिताली सध्या चर्चेत आहे. परंतु, आता लग्नासोबतच तिची आणखी एका कारणामुळे चर्चा रंगू लागली आहे. ही चर्चा म्हणजे तिच्या आगामी ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटाची. या चित्रपटात मिताली पहिल्यांदाच एका अनोख्या अंदाजात पाहायला मिळत आहे.
‘हॅशटॅग प्रेम’ या आगामी चित्रपटात मिताली झळकणार असून अभिनेता सुयश टिळक तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मितालीचा बोल्ड आणि बिंधास्त अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
“दोस्तीवाली फ्रेम, हॅशटॅग प्रेम…’’ असे या गाण्याचे बोल असून यात मिताली बेधुंद होऊन डान्स करताना दिसत आहे. हे गाणं आशिष पाटीलने कोरिओग्राफ केलं आहे. तर प्रविण कुवर आणि रुपाली मोघे यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.
माऊली फिल्म प्रोडक्शनअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती अनिल गोविंद पाटील यांनी केली आहे. तर दिग्दर्शन राजेश जाधव यांनी केलं आहे. सध्या तरी या चित्रपटातील मिताली आणि सुयशच्या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. मात्र, अन्य कलाकारांची नाव गुलदस्त्यात आहेत. तसंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील निश्चित करण्यात आलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 3:24 pm