जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जाचा आधार असलेला ‘कलम ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने उचलले. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानी ट्रोलर्सनी सोशल मीडियाद्वारे भारतीय कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच पाकिस्तानच्या एक निवेदकाने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ‘दीपिकाला पाहिल्यानंतर मला उलटी येते’, असं या निवेदकाने म्हटलं आहे.
पाकिस्तानमधील छोट्या पडद्यावरील निवेदक वकार जका (Waqar Zaka) याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने भारतीय कलाकारांवर टीका केली आहे. सोबतच पाकिस्तानमध्ये भारतीय अभिनेत्रींचे बिलबोर्ड्स लावू नये अशी विनंती त्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे केली आहे.

“जर बड्या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कृपा करुन ब्रॅण्डची जाहिरात करण्यासाठी भारतीय अभिनेत्रींचे बिलबोर्ड पाकिस्तानमध्ये लावू नयेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना माझी विनंती आहे की पाकिस्तानमध्ये भारतीय अभिनेत्रींचे जेवढे बिलबोर्ड्स असतील ते सारे हटविण्यासाठीचे उपाय करावेत”, असं वकार म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “भारतीय अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणला पाहिलं तर मला उलटीसारखं होतं. मी ज्यावेळी दीपिकाला प्रत्यक्षात समोरुन पाहिलं होतं, तेव्हा मला अक्षरश: उलटी आली होती. आणि प्रियांकाला पाहिल्यानंतर तर अत्यंत किळस वाटली होती”.

दरम्यान, वकारचाहा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र दीपिका किंवा प्रियांकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वकार हा पाकिस्तानमधील एक रेडिओ जॉकी आहे.