आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ५४ व्या वर्षी इरफाननं जगाचा निरोप घेतला. दरम्यान प्रसिद्ध लेखक पाउलो कोएल्हो यांनी भगवत गीतेमधील एका श्लोकाच्या माध्यमातून इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“हा तारा आकाशातील इतर ताऱ्यांमध्ये सामील झाला. धन्यवाद इरफान खान. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म निश्चित आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन पाउलो कोएल्हो यांनी इरफानला श्रद्धांजली दिली. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पाउलो एक जगप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी आजवर ‘द अलकेमिस्ट’, ‘अॅडल्टरी’, ‘मॅन्युअल ऑफ द वॉरिअर ऑफ लाईट’, ‘द विच ऑफ पोर्टोबेलो’ यांसारख्या अनेक लोकप्रिय कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.