करोनाच्या दुसऱ्या लाटेतही १३ मे रोजी ईदच्या दिवशी रिलीज झालेला अभिनेता सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकुळ घातलाय. अनेक ठिकाणी चित्रपटगृह बंद असल्याने हा चित्रपट केवळ तीन चित्रपटगृहात रिलीज करण्यात आलाय. पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर मात्र या चित्रपटाला अपेक्षेपेक्षाही जास्त व्यूअरशिप मिळत आहे.

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर Pay Per View च्या आधारे रिलीज करण्यात आला. झी फ्लेक्स वर हा चित्रपट एकदा पाहण्यासाठी २४९ रूपये भरावे लागतात. मीडिया ट्रेंडचा अभ्यास करणारी संस्था ओरमेक्स मीडियाच्या अहवालानुसार ‘राधे’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत 8.9 मिलियन म्हणजेच 89 लाख व्ह्यूव्ह मिळाले आहेत. याच आधारे ‘राधे’ चित्रपटाने केवळ चार दिवसांत डिजिटल प्लॅटफॉर्मवर 221 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. यातील 4.2 मिलियन व्ह्यूव्ह तर पहिल्याच दिवशीचे आहेत. ट्रेंड जाणकारांच्या म्हणण्यानुसार डिजिटल प्लॅटफॉर्मवर पे पर व्ह्यूव्हच्या आधारे हा चित्रपट रिलीज करणं निर्मात्यांना फायद्याचं ठरलं आहे.

या चित्रपटाच्या थिएट्रिकल बिजनेसबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट संपूर्ण देशात केवळ तीनच चित्रपटगृहात रिलीज करण्यात आलाय. हे तीनही चित्रपटगृह त्रिपुरामधलेच आहेत. या चित्रपटाच्या ओपनिंग विकेंडमध्ये या तीन चित्रपटगृहातून केवळ ६० हजारांची कमाई झालेली आहे. पण ही कमाई तिथल्या चित्रपटगृहांमध्ये नियमांचं पालन करून काही ठराविक वेळेसाठीच चित्रपटगृह सुरू ठेवल्यानंतरची आहे.

‘राधे’ चित्रपटाच्या कमाईचा तिसरा मार्ग म्हणजे विदेशातील चित्रपटगृह. अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलॅंड आणि मिडल ईस्टमधल्या सर्वच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाने रिलीजच्या सहा दिवसांतच जवळजवळ 2.21 कोटी रूपयांची कमाई केली आहे तर न्यूजीलॅंडमध्ये जवळजवळ 42 लाख रुपये जमा केले आहेत. विदेशातली ‘राधे’ची कमाई 2 मिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. यातील 70 टक्के कमाई ही मिडिल ईस्ट मधली आहे.

प्रभूदेवा दिग्दर्शित ‘राधे’ चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता रणदीप हुड्डा हा खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे. याव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, गौतम गुलाटी, सुधांशु पांडे यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.