हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही हा न संपणारा वाद आहे. मात्र शाहरुख खान, सोनू सुद, प्रियांका चोप्रा, कंगना रणौत, कतरीना कैफ यांसारख्या बाहेरून आलेल्या अभिनेते अभिनेत्यांनीही चांगला जम बसवला आहे असं मत अभिनेत्री रवीना टंडनने व्यक्त केलं. त्यांच्यासारखेच अनेक लोक हिंदी सिनेसृष्टीत आले आणि यशस्वी झाले असेही रवीना टंडनने म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुंबई मंथन या कार्यक्रमात रवीना टंडनची हजेरी होती त्यावेळी तिला हिंदी सिनेसृष्टीतील घराणेशाहीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर तिने हे उत्तर दिले.

रवीना टंडन ही फिल्ममेकर रवी टंडन यांची मुलगी आहे. तिला लहान असल्यापासून हिंदी सिनेसृष्टीची ओळख आहे. असे असूनही मी कधीही म्हटले नाही की मला चित्रपटात घ्या. मी हाच विचार केला होता की जर माझ्यात कलागुण असतील तर मला संधी मिळेल. मी जी काही कामं मिळवली ती माझ्या कलागुणांमुळेच मिळवली. मी कोणालाही पोर्टफोलिओ पाठवला नव्हता असेही तिने स्पष्ट केले. मला अनेकांनी कॉलेजमध्ये जाताना आणि इतर ठिकाणी वावरताना पाहिले. त्यानंतर मला सिनेमाच्या ऑफर आल्या असंही रवीना म्हटली.