बॉलिवूडमधील सध्याचा लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणजे रोहित शेट्टी. रोहितने गेल्या काही दिवसांमध्ये एका पाठोपाठ एक असे आठ हिट चित्रपट दिले आहेत. त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. पण नेहमी हिट चित्रपट देणारा रोहित शेट्टी पुरस्कार सोहळ्यांना मात्र अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळते.
नुकताच रोहितने नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान त्याने पुरस्कार सोहळ्यांविषयी वक्तव्य केले आहे. तसेच पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्यासाठी त्यांनी पैसे दिले किंवा एखादा पुरस्कार देणार असतील तरच तो पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो असे तो म्हणाला. ‘त्यांनी मला पैसे दिले तरच मी पुरस्कार सोहळ्यांना जातो. जर त्यांनी मला पैसे दिले आणि सूत्रसंचालन करण्यास सांगितले किंवा जर ते मला पुरस्कार देणार असतील तरच मी जातो. अन्यथा नाही. कारण हे सर्व बनावट असतं’ असे रोहित म्हणाला. जे व्यावसायिक कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यांना देखील महत्त्व देऊ नये असेही मत रोहितने मांडले आहे.
लवकरच रोहीत शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ‘सिम्बा’, ‘सिंघम’मधील अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार हे कलाकारदेखील झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच हा चित्रपट २७ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.