अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) करत असलेल्या चौकशीमध्ये सारा अली खानचे नाव समोर आले. एनसीबीकडून तिची चौकशी करण्यात आली होती. आता सैफ अली खानने साराला मदत करण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सैफने साराला मदत करण्यास नकार दिला आहे. तसेच साराचे नाव ड्रग्ज प्रकरणात येताच सैफने एक्स वाइफ अमृता सिंहला देखील सुनावले आहे. सध्या सैफ तैमुर आणि करीना कपूरसोबत दिल्लीला निघून गेला आहे. तेथे करीनाचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढाचे चित्रीकरण सुरु आहे. साराची आजी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर ही तिची मदत करत असल्याचे म्हटले आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावे समोर आली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) २३ सप्टेंबर रोजी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, शनिवारी (२६ सप्टेंबर) रोजी दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी झाली.