‘फॉल्ट इन अवर स्टार’ The Fault in Our Stars या ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. अखेर हा शोध संपला असून संजना संघी ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
जॉन ग्रीन यांची ‘फॉल्ट इन अवर स्टार’ ही कादंबरी खूपच गाजली. जगातल्या सर्वाधिक खपाच्या कादंबरीत या कादंबरीचा समावेश आहे. २०१४ मध्ये या कादंबरीवर आधारित चित्रपटही आला. जो हॉलिवूडमधला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाचा रिमेक लवकरच हिंदीतून पाहायला मिळणार असून सुशांत सिंह राजपुत या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. सुशांतसोबत संजना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरु होता. अखेर सुशांतनं ट्विट करत संजना मुख्य भूमिका करत असल्याची आनंदवार्ता आपल्या चाहत्यांना दिली.
कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांनी देखील संजनाची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. ‘फॉल्ट इन अवर स्टार’मधल्या हेजलची भूमिका संजना उत्तम साकारू शकते असं मुकेश यांनी म्हटलं आहे. संजनाच्या वाट्याला आलेली ही आतापर्यंतची मोठी भूमिका आहे, याआधी संजना रॉकस्टर, फुकरे रिटर्न आणि हिंदी मीडिअम यांसारख्या चित्रपटातून दिसली होती.