बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेला ‘पानिपत’ हा चित्रपट अखेर शुक्रवारी (६ डिसेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला. १७६१ साली अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झालेल्या युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत झळकला आहे. पानिपत प्रदर्शित होण्यापूर्वी संजयने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने तुरुंगात असतानाचे काही अनुभव शेअर केले सोबतच तुरुंगात केलेल्या कामातून मिळालेल्या पैशांचं त्याने काय केलं हेदेखील सांगितलं.

शो सुरु असताना कपिलने संजय दत्तला त्याच्या तुरुंगातील काही आठवणींवर प्रश्न विचारले. यावेळी त्याने ‘संजू’ चित्रपटातील काही सीनचे उदाहरणं सांगून संजयला तुरुंगातील त्या आठवणींवर भाष्य करण्यास लावलं. विशेष म्हणजे संजयने देखील तुरुंगात त्याने काय केलं किंवा तेथे केलेल्या कामातून मिळालेल्या पैशांचं नंतर काय केलं हे सांगितलं.

“सर येथे असलेल्या साऱ्यांनीच संजू चित्रपट पाहिला आहे. त्यात दाखविण्यात आलं आहे की, तुम्ही तुरुंगात असताना एक रेडिओ प्रोग्राम सुरु केला. तसंच फर्निचरचं काम केलं. इतकंच कशाला तर कागदी पिशव्या तयार केल्यात. हे कसं काय शक्य झालं? म्हणजे हे किती वेळामध्ये शिकला?”, असा प्रश्न कपिलने संजयला विचारला. त्यावर संजयनेदेखील मनमोकळेपणाने उत्तर दिली.

“या सगळ्या गोष्टी शिकायला मला बराच वेळ लागला होता. पण ते काम करणं गरजेचं होतं. कारण त्या कामाच्या मोबदल्यात आम्हाला पाईंट्स मिळायचे. तसंच जर शिक्षा कमी करायची असेल तर काम करावंच लागतं. मला एक पेपर बॅग तयार करण्यासाठी १० पैसे मिळायचे”, असं संजयने सांगितलं.

पुढे तो म्हणाला, “खरं तर हे पैसे मी एका खास कारणासाठी कमवत होतो. मला रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला ओवाळणी टाकता यावी यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. त्यानुसार मी कागदी पिशव्या तयार करुन जे पैसे कमविले ते रक्षाबंधनला माझ्या बहिणीला दिले”.

दरम्यान,संजयने शोमध्ये जो किस्सा सांगितला तो ऐकून उपस्थित सारेच भावूक झाले. शिक्षा भोगत असताना त्याने कारागृहामध्ये तयार केलेल्या कागदी पिशव्यांच्या कमाईतून त्याने ४४१ रुपये कमावल्याचं सांगण्यात येतं. संजयला१९९३ च्या मार्च महिन्यात मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असल्यामुळे शिक्षा झाली होती.