प्रेमात पडणाऱ्यांसाठी आणि प्रेमात पडलेल्यांसाठी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट अत्यंत खास आहे. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांच्यातील केमिस्ट्री प्रत्येक प्रेक्षकाला आणि तरुणाईला भावली, त्यामुळे हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटातील प्रत्येक संवाद, सीन हे अत्यंत सुंदररित्या सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही सीन प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरले. अशाच एका सीनविषयी शाहरुखने एका मुलाखतीत नवीन खुलासा केला.
‘मेरी क्लेअर’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने या दृश्याची खरी गंमत सांगितली. या सीनमध्ये अमरिश पुरी हे कबुतरांसाठी दाणे टाकत असतात आणि मागून शाहरुख येऊन तो सुद्धा त्यांच्याच पद्धतीने दाणे टाकण्याचा प्रयत्न करतो. या सीनमध्ये शाहरुख दाणे टाकताना ‘आओ आओ’ असं म्हणतो. पण हा संवाद मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हता. शाहरुखने त्यावेळी ओघानेच तो संवाद घेतला आणि प्रेक्षकांनाही तो प्रचंड आवडला.
यातील आणखी एका दृश्यामध्ये शाहरुख त्याच्या वडिलांना (अनुपम खेर) नापास झाल्याचं सांगतो. त्यावेळी अनुपम खेर त्यांच्या पूर्वजांबद्दल सांगत असतात. अनुपम खेर यांचे काकासुद्धा सातवी- आठवीत नापास झाले होते. दिग्दर्शकांची परवानगी घेत त्या दृश्यामध्ये अनुपम खेर यांनी स्वत:च्या काकांची खरी नावं सांगितलं.
बॉक्स ऑफिस कलेक्शनचे विक्रम मोडणाऱ्या या चित्रपटाला आता २५ वर्षे पूर्ण होतील. आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडीच्या चित्रपटांपैकी एक आहे.