देशावर ओढवलेल्या संकटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी भारताची तुलना अमेरिका आणि ब्राझीलशी करत सध्य परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान मोदींच्या या भाषणावर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लॉकडाउन हळूहळू कमी होतोय पण करोना अद्याप गेलेला नाही, असं म्हणत त्यांनी मोदींच्या विचारांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

“करोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे. आता आपल्या आर्थिक व्यवहारांनाही गती प्राप्त होत आहे. लोक कमानिमित्त घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठा आता हळूहळू पहिल्यासारख्या चमकू लागल्या आहेत. लॉकडाउन आता हळूहळू कमी होत चालला आहे. पण लक्षात असू द्या करोना अद्याप गेलेला नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन शेखर कपूर यांनी मोदींच्या विचारांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

यापूर्वी काय म्हणाले होते मोदी?

“देशात १२ हजार क्वारंटाईन सेंटर व देशात करोना चाचण्या करणाऱ्या २ हजार प्रयोगशाळा सुरू आहेत. करोना महामारी विरोधातील लढाईत चाचण्यांची वाढती संख्या आमची ताकत आहे. हा काळ निष्काळजीपणा करण्याचा नाही. आता करोनापासून धोका नाही, असं समजण्याचा नाही. विषाणू वाढू नाही, यासाठी काळजी घ्यावी लागेल. काही व्हिडीओ आणि छायाचित्रातून असं दिसतंय की, काही लोकांनी खबरदारी घेणं सोडून दिलं आहे. तर तुम्ही आपल्या कुटुंबाला संकटात टाकत आहात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं,” असं मोदी म्हणाले होते.