कलाविश्वात सेलिब्रिटींच्या अफेअर्स, ब्रेकअप व पॅचअपच्या चर्चा काही नवीन नाहीत. काही सेलिब्रिटी त्यांच्या नातेसंबंधांवर खुलेपणाने बोलतात तर काहीजण त्यावर मौन बाळगणं पसंत करतात. अभिनेत्री श्रुती हासनने तीन वर्षांपूर्वी ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिचा ब्रेकअप झाला. इटालियन बॉयफ्रेंड मायकल कोर्सेल याच्याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलेपणाने व्यक्त झाली.
लक्ष्मी मंचू सूत्रसंचालन करत असलेल्या ‘फीट अप विथ द स्टार्स’ या रिअॅलिटी शोमध्ये श्रुतीने हजेरी लावली होती. या शोमध्ये एक्स बॉयफ्रेंड मायकलविषयी श्रुती म्हणाली, ”मी आधी फार शांत स्वभावाची होते. माझ्या निरागस स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतला. मी फार भावनिक असल्याने माझ्यावर हक्क गाजवणे अनेकांसाठी सोपं होतं. रिलेशनशिपबद्दल बोलायचे झाल्यास, तो अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता असं मी म्हणेन.”
प्रेमात पडण्याविषयी ती पुढे म्हणाली, ”आतासुद्धा प्रेमात पडण्यासाठी असं काही खास सूत्र नाही. चांगले व्यक्ती हे कधी चांगले वागतात तर कधी वाईटसुद्धा. पण मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. माझ्यासाठी तो संपूर्ण एक चांगला अनुभव होता. त्यातून मी खूप काही शिकले. पण त्या खास प्रेमाच्या शोधात मी कायमच असेन आणि ते जेव्हा मिळेल तेव्हा मी जगासमोर त्याचा खुलासा करेन.”
Life has just kept us on opposite sides of the globe unfortunately and so we have to walk solo paths it seems. But this young lady will always be my best mate. So grateful to always have… https://t.co/8KYFwxXgOa
— Michael Corsale (@MichaelCorsale) April 26, 2019
२०१६ मध्ये इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित श्रुती आणि मायकलने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अधिकृतरित्या चाहत्यांना सांगितलं होतं. तर यावर्षी एप्रिल महिन्यात ट्विटरवर एक पोस्ट लिहित मायकलने ब्रेकअपचा इशारा दिला होता. ”दुर्दैवाने आयुष्याने आम्हाला या जगाच्या दोन टोकांवर उभं केलं आहे. त्यामुळे यापुढची वाटचाल आम्हाला एकत्र करणार नाही. पण ही तरुणी माझ्या आयुष्यातील सर्वांत उत्कृष्ट साथीदार आहे. त्यामुळे मैत्रीण म्हणून ती माझ्यासोबत नेहमीच असल्याने मी तिचा कृतज्ञ आहे,” अशा शब्दांत मायकलने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
श्रुती सध्या तिच्या आगामी ‘लाबम’ या तामिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. एस.पी. जननाथन दिग्दर्शित या चित्रपटात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत.