ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करतात. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी सक्रिय आहेत. किंबहुना या माध्यमातून ते विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करत असतात. पण, सोशल मीडियावरुन ठाम भूमिका मांडणाऱ्या अख्तर यांची विचारसरणी पाहून एका युजरने त्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना धर्मांध म्हटले आहे.

‘जावेद अख्तर उत्कृष्ट कवी आहेत. पण, सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट पाहून ते धर्माबाबत किती कट्टर विचारसरणीचे आहेत हे आम्हाला समजले आहे’, असे ट्विट करत एका युजरने अख्तर यांच्याविषयी आपले मत मांडले. ‘Cockroach Masakadzas’ या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेले हे ट्विट पाहून अख्तर यांनी त्या युजरला धारेवर धरत त्याला खडे बोल सुनावले. त्या युजरच्या अकाऊंटमध्ये झुरळाचा उल्लेख पाहून हीच गोष्ट हेरत अख्तर यांनी लिहिले, ‘तुझ्याहून जास्त बुध्यांक असणाऱ्या कित्येक झुरळांना मी पाहिले आहे. काहीच अस्तित्त्व नसल्यामुळे मी तुझी चिडचीड समजू शकतो. पण, यात माझा काय दोष? कारण, मी तुझा बाप नाही.’

जावेद अख्तर यांनी उपरोधिक टोला लगावत ज्या भाषेत ट्विट केले, त्यावर काही ट्विटर युजर्सनी नाराजी व्यक्त केली. ‘लोकप्रिय कवीच्या तोंडून ही भाषा… वा!’, असे ट्विट करत एका युजरने अख्तर यांना उपरोधिक टोला लगावला. त्या ट्विटला उत्तर देत अख्तर यांनी लिहिले, ‘कधीकधी अशा व्यक्तींना जशास तसे उत्तर देणेच योग्य असते. गेल्या बऱ्याच काळापासून मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करतोय. पण, आता मात्र तसे होणार नाही.’ कट्टर विचारसरणीच्या मुद्द्वरुन नेटकऱ्यांनी अख्तर यांना जाळ्यात पकडले खरे, पण त्यांच्या टीकेलाही त्यांनी चोख उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण