गणपती बाप्पाचे स्वागत आपण खूपच उत्साहात, जल्लोषात करतो. विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना सगळ्यांनाच खूप दु:ख होतं. मात्र विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी चौपाट्यांची स्थिती अत्यंत वाईट असते. चौपाटीचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं चिंता व्यक्त केली आहे.

या फोटोमध्ये विसर्जनानंतर चौपाटीचे झालेले हाल पाहायला मिळत आहे. निर्माल्य, प्लास्टिक, मूर्तींचे अवशेष समुद्रकिनारी वाहून आल्याचे दिसत आहे. ”कालच्या विसर्जनानंतर आपण केलेल्या नुकसानीचे जर हे चित्र नसेल तर मला माहीत नाही की याहून वेगळं काय असेल. हे होता कामा नये. ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे,” असं लिहित सोनालीने नागरिकांना आवाहन केलं आहे.

गणेशोत्सवात लोकांमधील आनंद ओसंडून वाहत असतो. पण गणेश विसर्जनानंतर त्याचा समुद्रकिनाऱ्यांवर होणारा विपरित परिणाम कचऱ्याच्या रुपात पाहायला मिळतो. मूर्तींचे अवशेष आणि निर्माल्य यांमुळे किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होते. मूर्तींमधील प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलचरांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. याविषयी जनजागृती होऊनही चित्र काही बदलताना दिसत नाही. सोनालीनं तिच्या पोस्टद्वारे हीच चिंता व्यक्त केली आहे.