नवीन वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केल्यानंतर बॉलिवूड बादशहा आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खान दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागल्याचे सूत्रांकडून समजते. शाहरुख या आगामी चित्रपटामध्ये एका वेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या भूमिकेपेक्षा या चित्रपटातील शाहरुखची फक्त भूमिकाच नव्हे तर नायिका देखील वेगळी असणार आहे. बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. यापूर्वी आनंद राय याच्यासोबत काम करणाऱ्या सोनमची बॉलिवू़ड बादशहा शाहरुख सोबत काम करण्याची ही पहिलच वेळ असेल. आनंद राय यांच्या रांजना चित्रपटामध्ये सोनम धानुषसोबत झळकली होती या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिल्याचे पाहायला मिळाले होते.

आनंद राय यांच्या आगामी चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ याची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र राय यांनी या आघाडींच्या अभिनेत्रींना डावलन सोनम कपूरला पसंती दिल्याचे समजते. या चित्रपटासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळाल्यास सोनमसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. काही दिवसांपूर्वीच सोनमने एका मुलाखतीमध्ये  सोनमने शाहरुख सोबत काम करण्याची इच्छा दर्शवली होती.

सोनम कपूरने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ चित्रपटातील अभिनयाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. सोनमच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे तर ‘वीरे दी वेटिंग, ‘पॅडमेन’ आणि ‘दत्त’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाशिवाय सोनमची उपलब्धी सांगायचे तर स्वतःचे डिजिटल स्टिकर असणारी सोनम कपूर ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरल्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोनमने आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांच्या रुपात हे डिजिटल स्टिकर बनवण्यात आले आहेत. असे हे बहुरंगी आणि बहुढंगी डिजिटल स्टिकर लवकरच प्रदर्शित केले जाणार असून सोनमच्याच सिग्नेचर अॅपवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सोनम ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचे स्वतःचे अॅप लॉन्च झाले आहे.