सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली व लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदानसुद्धा नव्वदच्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्या काळात सोनी राजदान यांनी बऱ्याच सक्षम स्त्रीच्या भूमिका साकारल्या होत्या. १९९३ साली त्यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये सोनी यांच्यासोबतच श्रीदेवी व संजय दत्त यांच्या भूमिका होत्या. तर याचं दिग्दर्शन आलियाचे वडील व दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केलं होतं. या चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण करताना सोनी राजदान यांनी बऱ्यात सिगारेट ओढल्या होत्या आणि त्यावेळी त्या गरोदर होत्या. याचा खुलासा खुद्द सोनी राजदान यांनी केला आहे.
‘गुमराह’ चित्रपटात सोनी राजदान यांनी एका कैदीची भूमिका साकारली होती. यातील एका दृश्यासाठी त्यांना बरेच सिगारेट ओढावे लागले होते. या चित्रपटातील फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी हा किस्सा सांगितला. ‘माझ्या सर्वांत आवडत्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आणि यातील माझ्या भूमिकेची त्यावेळी फार प्रशंसा झाली होती. श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी गरोदर होती. आलिया पोटात असताना एका सीनसाठी मी एकामागोमाग एक बऱ्याच सिगारेट ओढल्या होत्या. मी गरोदर असल्याची कल्पना मला तेव्हा नव्हती,’ असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं.
आलिया भट्ट ही सोनी राजदान व महेश भट्ट यांची दुसरी मुलगी आहे. तर शाहिन भट्ट ही आलियाची मोठी बहीण आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 1:30 pm