अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) मुंबईत राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर तो मागील अनेक महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता अशी माहिती समोर आली आहे. त्याच वेळी सतत डाववलं गेल्यामुळे तो निराशेच्या गर्तेत ढकलला गेला आणि त्यामधूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर बॉलिवूड हदरलं आहे. अनेक कलाकारांनी सुशांतला सोशल नेटवर्किंगवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र अनेक चाहत्यांनी आणि चित्रपट प्रेमींनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार असल्याची टीका केली आहे. अभिनेत्री कंगणा रनौतनेही एक व्हिडिओ पोस्ट करुन बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. यानंतर हळूहळू मनोरंजन सृष्टीमधील काही कलाकारांनीही पुढे येऊन चकाकत्या मनोरंजन सृष्टीची दुसरी बाजू दाखवत घराणेशाहीसंदर्भात धक्कादायक खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक कलाकारांना आणि स्वत:च्या कष्टाने मोठ्या झालेल्या कलाकारांना पाठिंबा देण्याची आणि घराणेशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून अगदी सोशल नेटवर्किंगपासून ते वृत्तवाहिन्यांवरील चर्चापर्यंत सगळीकडे दिसून येत आहे. याच सर्व प्रकरणात आता युट्यूब स्टार असणाऱ्या बुवन बामने नेटकऱ्यांना एक लाखमोलाचा सल्ला दिला आहे. बुवन केलेलं ट्विट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

घराणेशाहीला विरोध करत केवळ स्टार किड्सला प्राधान्य देणाऱ्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करणाऱ्या नेटकऱ्यांना बुवनने त्यांच्या एका नेहमीच्या सवयीवरुन चिमटा काढला आहे. “जर तुम्हाला खरोखरच कौशल्य असणाऱ्या लोकांना समर्थन आणि पाठिंबा द्यायाचा असेल तर तुमच्या मित्रांना पाठिंबा द्या. त्यांच्या लाइव्ह शोसाठी मोफत एन्ट्री पास मागत जाऊ नका. त्यांची गाणी, कला, डान्सचे व्हिडिओ शेअर करा. तुमच्या आजूबाजूच्या स्थानिकांमधील कौशल्याला प्रोत्साहन द्या. असं केलं तरच तुमच्या ट्विट्स आणि स्टेटसला अर्थ आहे,” असं बुवनने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अनेकदा मित्रांच्या कर्याक्रमांचे मोफत पास मागणाऱ्यांची बुवनने अगदी गोड शब्दांमध्ये कानउघडाणी केली आहे. स्थानिकांना बॉलिवूडमध्ये योग्य मानसन्मान दिला जात नाही असं सोशल मिडियावरुन व्यक्त होणाऱ्या तरुणांनी त्यांच्या मित्रांच्या कौशल्यालाही पाठिंबा द्यावा असं बुवनने म्हटलं आहे. बुवनं हे ट्विट साडे नऊ हजारहून अधिक वेळा रिट्विट झालं आहे. तर ८५ हजारहून अधिक जणांनी त्याला लाइक केलं असून एक हजारहून अधिक चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.