करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला हादरुन टाकले आहे. दिवसेंदिवस करोना संक्रमित लोकांची आणि मृतांच्या संख्येत वाढत होत आहे. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. कोणाला ऑक्सिजन सिलेंडर मिळतं नाही तर कोणाला बेड आणि व्हेंटिलेटर मिळतं नाही. या सगळ्यावर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी संतापला आहे. एवढंच नाही तर यावेळी त्याने राजकारण्यांना जबाबदार ठरवलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, “जे राजकारणी खुर्चीवर बसतात ते फक्त पुढील पाच वर्षे पैसे कसे कमवायचे याचा विचार करतात. सिस्टमसाठी काय केले पाहिजे याचा विचार ते करतं नाही. त्यात आता एकमेकांवर आरोप करण्याची ही वेळ नाही,” असे सुनील म्हणाला.

राजकारण्यांवर नाराजी व्यक्त करत सुनील शेट्टी म्हणाला, “या लोकांना आपण निवडले आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला बेड्स, ऑक्सिजन आणि उपचारासाठी भटकावे लागत आहे. या लोकांनी आम्हाला निराधार केलं असून आम्हाला प्रत्येक गोष्ट मागावी लागत आहे.”

तो पुढे म्हणाला, “चला आपण प्रत्येक क्षेत्रात चांगल्या लोकांची निवड करुया. बदल करण्यासाठी कष्ट करणाऱ्या लोकांना मतदान करा. असे लोक कोणत्याही राजकीय पक्षात असू शकतात.”

सुनील पुढे म्हणाला, “आपण सगळे कठीण परिस्थितीतून जात आहोत आणि या कठीण काळात आपण एकमेकांना पाठिंबा देण्याची गरज आहे. मी जेव्हा पण मदत मागितली तेव्हा मला कोणी नकार दिला नाही आणि हे यासाठी आहे कारण लोकांना एकमेकांची मदत करायची आहे.”

सुनील शेट्टीने एप्रिल महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोहिम सुरु केली. त्या मोहिमेच्या अंतर्गत तो लोकांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करुन देत आहे. सुनीलला फक्त मुंबई आणि बंगळुरू नाही तर इतर अनेक ठिकाणांहून त्याच्याकडे मदत मागितली जातं आहे. लवकरच सुनील ही फ्री सुविधा हैद्राबादमध्ये सुरु करणार आहे.