अभिनेत्री कंगना रणौतला मोदी सरकारकडून Y+ श्रेणीतील सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. आता तिला पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून अनेकांनी टीका केली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करनेही अप्रत्यक्षरित्या सरकारला टोला लगावला आहे.

ट्विटरवर एका युजरने कंगनाऐवजी स्वरा भास्करा Y+ सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे, असं म्हटलं. त्यावर उत्तर देताना स्वराने सरकारवर टीका केली. ‘जर कोणत्या अभिनेत्रीला सर्वाधिक सुरक्षेची गरज असेल तर ती स्वरा भास्कर आहे. कारण तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील टाइमलाइनवर असंख्य धमक्या व अश्लील टिप्पणी येत असतात. इतकंच नव्हे तर भाजपाच्या व्हेरिफाइड (अधिकृत) अकाऊंटवरूनही तिच्यासाठी असभ्य टिप्पणी केली जाते. पण अखेर विचारधारा महत्त्वाची असते’, असं ट्विट एका युजरने केलं. त्यावर उत्तर देताना स्वरा म्हणाली, ‘धन्यवाद पण मला अशा सुरक्षेची गरज नाही. त्यापेक्षा करदात्याचा पैसा विकास, उपासमार, कुपोषण यांसाठी वापरण्यात यावा.’

कंगनाला का देण्यात येणार सुरक्षा?

मुंबईविषयी वक्तव्य करणाऱ्या कंगनावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळेच त्यांना प्रत्युत्तर देत कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबई येणार असल्याचं ठरवलं आहे. त्यामुळे तिच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.