छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. प्राजक्ता फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देते हे तर तिच्या चाहत्यांना माहितच असेल. पण तिला साडी, नथ आणि मेकअपमध्ये वर्कआऊट करताना पाहून नेटकरीसुद्धा अवाक् झाले.

‘तुमच्या मर्यादांना पार करा’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय. या व्हिडीओत ती साडी आणि मेकअपमध्ये वर्कआऊट करत असून आजूबाजूचे लोक तिच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. यामागचं कारण म्हणजे प्राजक्ताने या जिमचं उद्धाटन केलंय. या नव्या जिमच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्राजक्ताला आमंत्रण देण्यात आलं होतं. तिच्या हस्ते या जिमचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर तिने सर्वांत आधी जिममध्ये वर्कआऊटचा शुभारंभ केला.

प्राजक्ता शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातही व्यायाम कधीच चुकवत नाही. शारीरिक अन् मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी ती व्यायामासोबतच मेडिटेशनही करते. फक्त व्यायामच नाही तर पौष्टिक पदार्थ खाल्ले जावे यासाठी ती सजग असते. प्रत्येकाने आपल्यासाठी, कुटुंबासाठी व्यायाम, योगा आणि प्राणायामसाठी वेळ दिलाच पाहिजे असं तिचं मत आहे.