करोना विषाणूचे संक्रमण अद्याप नियंत्रणात आलेले नाही. परिणामी घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे. परंतु अनेक लोक सरकारने व पोलिसांनी दिलेल्या या सुचनांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. वारंवार सुचना करुनही मास्क शिवाय घराबाहेर फिरताना दिसत आहेत. या मंडळींना मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी नागपूर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी जेठालालच्या मिम्सचा वापर केला आहे.

नागपुर पोलिसांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये जेठालाला आपल्या तोंडावर मास्क लावून बसलेला दिसत आहे. “तुम्ही गोकुळधाम सोसायटीमध्ये जा किंवा गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे.” अशा आशयाची कॉमेंट या फोटोवर केली आहे. नागपुर पोलिसांचे हे अनोखे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जेठालाला हे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेतील एक लोकप्रिय पात्र आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेता दिलीप जोशी यांनी साकारली आहे. “क्या तपलीक है आपको” या वाक्यासाठी जेठालाल प्रसिद्ध आहे. हेच वाक्य पोलिसांनी या ट्विटमध्ये वापरले आहे. यापूर्वी असेच काहीसे ट्विट मुंबई पोलिसांनी देखील केले होते. त्यांनी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील विकी कौशलचा फोटो वापरुन ‘हाउज द डिस्टन्स’ हा मेसेज मुंबईकरांना दिला होता.