एका सेलिब्रिटीच्या पत्नीला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याबाबत अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी व लेखिका ताहिरा कश्यप हिने खुलासा केला. ताहिराने तिच्या खासगी आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं असून त्यात तिने या सर्व गोष्टी मोकळेपणाने लिहिल्या आहेत. आयुषमान खुरानाला चित्रपटात इंटिमेट सीन करताना पाहून तिची काय प्रतिक्रिया असते याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “विकी डोनर या चित्रपटापासून सर्व गोष्टी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मी गरोदर होते आणि गरोदरपणात माझं २० किलो वजन वाढलं होतं. स्वत:च्या दिसण्याबाबत न्यूनगंड तर होताच पण त्याचवेळी पतीला ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहून तळपायाची आग मस्तकात जायची. त्यावेळी मी जे वागले ते बालिश होतं आणि कदाचित प्रेग्नंसीमधील चिडचिडपणामुळे मी तसं वागले असावे. अनेकदा आयुषमानविषयी असुरक्षिततेची भावना माझ्या मनात आली. किंबहुना हे सर्व तिथेच थांबलं नाही तर त्यानंतरच्या नौटंकी साला या चित्रपटात त्याने किसिंग टाइमचा रेकॉर्डच मोडला होता. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या सर्व ठिकाणी त्याचीच चर्चा होती आणि त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला.”

फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत नसलेल्या कुटुंबातून येऊन हे सर्व सहन करणं सोपं नसतं, असं ती पुढे म्हणाली. मात्र वेळेनुसार या सर्व गोष्टी कमी महत्त्वाच्या वाटू लागल्या असंही तिने स्पष्ट केलं. “इथे तुम्ही एखाद्याचा पती किंवा एखाद्याची पत्नी आहात याने फरक पडत नाही. शेवटी अभिनय ही एक कला आहे”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

‘१२ कमांडमेंट्स ऑफ बीईंग अ वुमन’ या पुस्तकात ताहिराने तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने लिहिल्या आहेत. आयुषमानच्या संघर्षाचा काळ आणि आता यशस्वी झाल्यानंतर कशी परिस्थिती आहे याबाबतही तिने त्यात लिहिलं आहे.