बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच ती चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंगनाने भारतातील वाढत्या लोकसंख्येवर एक ट्वीट केलं होतं. त्यामुळे कंगनावर अनेकांनी टीका केली आहे. दरम्यान, विनोदवीर सलोनी गौरने कंगनावर यावेळी टीका केली आहे.

कंगनाचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘आपल्याला लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी मतदानाचे राजकारण करत असताना लोकांची जबरदस्तीने नसबंदी केली. ज्यामुळे त्या निवडणूक हरल्या आणि नंतर त्यांची हत्या देखील करण्यात आली. परंतु, आजच्या काळात भारताची वाढती लोकसंख्या आपल्यासाठी संकट आहे. एखाद्याला तिसरं मूल झालं तर त्याला दंड किंवा काही वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे,’ अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. कंगनाने थोडक्यात तिसरं अपत्य होऊ देणाऱ्या पालकांना कडक शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले आहे. कंगनाने असे ट्वीट केल्यानंतर सलोनीने तिला ट्रोल केले आहे.

याला उत्तर देत सलोनी म्हणाली, ‘स्वत: ला दोन भावंडे आहेत. मोठी बहीण रंगोली चंदेल आणि लहान भाऊ अक्षत रणौत.’ असे ट्वीट सलोनीने केले आहे.

तर कंगना इथेच थांबली नाही. कंगनाने देखील सलोनीला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘यात काही आश्चर्य नाही की तुझे विनोद तुझ्यावरच आहेत. माझ्या पणजोबांना ८ भावंड होती, त्याकाळात बरीच मुले मरायची, जंगलात जास्त प्राणी असायचे आणि माणसं फारचं कमी, बदलत्या काळाबरोबर आपण देखील बदलायला हवे, काळाची गरज म्हणजे चीन प्रमाणे आपण देखील लोकसंख्येवर कठोर नियम लावले पाहिजेत.’ सलोनीने अजुन कंगनाच्या या ट्वीटला उत्तर दिलेले नाही. आता सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष हे सलोनीच्या उत्तरावर लागले आहे.

दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.