शुक्रवार, २९ मे रोजी एकूण सहा मराठी चित्रपट प्रदर्शित केले जाणार होते. संभाव्य स्पर्धेचा अंदाज करून त्यापैकी दोन चित्रपट पुढे ढकलण्यात आले. आता प्रदर्शित होणाऱ्या चारही चित्रपटांमध्ये आघाडीचे आणि दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत असून प्रत्येक चित्रपटाचा विषय वेगवेगळा आहे. या चित्रपटांमध्ये होणारी स्पर्धा, प्रेक्षकसंख्येची विभागणी, चित्रपटगृहांची उपलब्धता आणि त्यामुळे एकूणच चित्रपटाच्या व्यवसायावर होणारा परिणाम याचा घेतलेला आढावा..

मराठी चित्रपटसृष्टीला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन वर्षांला १००-१२५ चित्रपटांचे रतीब सुरू होऊन बरीच वर्षे होत असली तरी व्यावसायिक व्यवस्थेचा आणि व्यवस्थापनाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे.  ४०० आसपास चित्रपटगृह, मर्यादित प्रेक्षकवर्ग अशा व्यावसायिक मर्यादा असताना २९ मे रोजी ‘प्राइम टाइम’, ‘सिद्धांत’, ‘धुरंधर भाटवडेकर’ आणि ‘पेइंग घोस्ट’ असे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग विभागणे, प्रत्येकाला प्राइम टाइम न मिळणे आणि आधीच सुरू असणाऱ्या चित्रपटांशीदेखील स्पर्धा करावी लागणार आहे. अशा व्यावसायिक अडचणीचा सामना करावा लागल्यामुळे कोणत्याही चित्रपटाचा व्यवसाय नीट होणार नसल्याची चर्चा या क्षेत्रात होताना दिसत आहे. त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शनाच्या तारखांवर नियंत्रण असावे की नसावे यावर पुन्हा एकदा वादविवाद रंगणार आहे.  
२९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा आशय निरनिराळा असला तरी एकाच वेळी चार चित्रपट आल्यामुळे योग्य चित्रपटगृह आणि योग्य वेळ मिळविण्याची धडपड सुरू झाली आहे. ‘जॉनर’ वेगळा असला तरी सर्वच चित्रपट संपूर्ण कुटुंबाने पाहिले जाणारे आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग या चार चित्रपटांमध्ये विभागला जाणार आहे. म्हणजेच एक सामायिक प्रेक्षकवर्ग असताना प्रत्येकालाच गल्लापेटीवर यशस्वी होण्यासाठी मजबूत मेहनत करावी लागणार आहे. सर्वसाधारणपणे किमान किफायतशीर व्यवसायासाठी मराठी चित्रपट किमान १००-१५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणे गरजेचे असते. त्यामध्ये ए, बी आणि सी अशा तीनही वर्गवारीतील शहरांमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. सध्या याच आकडय़ांवर सर्वाच्या उडय़ा पडत आहेत. मात्र चित्रपटगृहे मिळाली तरी प्राइम टाइम काही सर्वानाच मिळणे अशक्य असल्यामुळे आणखी एक नवा वाद सुरू होण्याची शक्यता सारेच निर्माते व्यक्त करीत आहेत. तर आजही १६८ चित्रपटगृहांमध्ये सुरू असणारा ‘टाइमपास २’, नुकताच प्रदर्शित झालेला ‘अगंबाई अरेच्चा’ यांच्याबरोबर हिंदीतले ‘पिकू’, ‘तनु वेडस् मनु रिटर्न्‍स’ यांचीदेखील स्पर्धा पुढील आठवडय़ात राहणारच आहे.
सध्या आपल्याकडे आठवडय़ाला दोन ते तीन चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यापैकी एखादा एकदमच तद्दन असल्यामुळे खरी स्पर्धा एकटय़ाची अथवा दोघांचीच असते. पण २९ मे रोजी प्रदर्शित होणारे चारही चित्रपट आशय-विषय-कलावंत यादृष्टीने चांगले तगडे आहेत. परिणामी आधीच मर्यादित असलेल्या प्रेक्षकांची रस्सीखेच सुरू होणार असे दिसते. अशाच प्रकारे १९ एप्रिल २०१३ रोजी एकाच दिवशी पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम प्रेम म्हणजे प्रेम’चे निर्माते प्रवीण ठक्कर सांगतात की, आम्ही चार महिने आधी तारीख जाहीर करूनदेखील आम्हाला या स्पर्धेला तोंड द्यावे लागले होते. किंबहुना मराठी चित्रपटसृष्टीतल्या ढिसाळ व्यवस्थापनाचाच आम्हाला फटका बसला असे म्हणावे लागले. तर त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘येडा’ आशुतोष राणाची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे निर्माते सतीश मोरे सांगतात की, प्रेक्षकांची संख्या काही वाढत नाही, पण विभागली गेल्याचा फटका बसला.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने याबाबत भूमिका घेतली असली तरी ‘चित्रपट प्रदर्शन नियंत्रणाच्या कोणत्याही नियमांच्या अथवा व्यवस्थेच्या अभावी सध्यातरी काही उपाय करता येणार नाहीत’, असे महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितले. एकाच वेळी दोनपेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत आणि त्यासाठी सर्वानुमते एखादी व्यवस्था असण्याची गरज त्यांनी मांडली आहे. मागील महिन्यात झालेल्या मंडळाच्या बैठकीत निर्मात्यांशी चर्चा झाली असून बडय़ा निर्मात्यांशी चर्चा होणे बाकी असल्याचे ते म्हणाले. लवकरच अशा घटनांवर सकारात्मक तोडगा काढणारी यंत्रणा तयार करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मात्र अशा प्रकारे व्यवसायावर नियंत्रण असू नये, अशी भूमिका मांडणारे निर्मातेदेखील आहेत. ‘एस्सेल व्हिजन’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने सांगतात की ‘‘हे करण्यामागे हेतू चांगला असला तरी अशा व्यवस्थेत तारखा आधीच अडविल्या जातील आणि केवळ असं बुकिंग केलं नाही म्हणून एखाद्या प्रासंगिक विषयावरील चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही असे होऊ शकते. परिणामी चांगल्या विषयावर अन्याय होऊ शकतो.’’ तसेच आगाऊ नोंदणीच्या पद्धतीमुळे तारखांचा बाजार मांडला जाण्याची शक्यतादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही स्पर्धा मुक्तच असावी.  
थोडक्यात काय तर आधीच मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत नसल्याची तक्रार केली जात असतानाच्या काळात प्रेक्षकवर्गाचे नेमके व्यवस्थापन न करण्यामुळे या उदासीनतेत भर पाडणारी अशीच परिस्थिती आहे.
*राज्यभरात आणि अमराठी राज्यातील मराठी ‘पॉकेटस्’ मिळून एकूण साधारण ४००- ४२५ स्क्रीन्स मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत. ‘टाइमपास २’, ‘बाजी’, ‘लय भारी’ अशा चित्रपटांनी हा आकडा गाठला होता. मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची ही पर्याप्त संख्या आहे. अमराठी राज्यातील ‘पॉकेटस्’ वगळता फार फार तर ३५० ते ४०० स्क्रीन्स उपलब्ध आहेत. बऱ्यापैकी व्यवसाय होण्यासाठी किमान १००-१२५ स्क्रिन्सवर चित्रपट झळकणे गरजेचे असल्याचे वितरक समीर दीक्षित सांगतात. त्यापैकी मुंबई, पुणे, नाशिक, प. महाराष्ट्र या पट्टय़ाचा वाटा हा साठ-सत्तर टक्क्य़ांच्या आसपास आहे. तर उर्वरित हिस्सा विदर्भ-मराठवाडय़ाचा आहे.

आजवर सर्वाधिक व्यवसाय झालेल्या ‘लय भारी’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ३६ कोटी रुपये इतके होते. एक तिकीट सरासरी  ८० रुपये किमतीचे धरले (मल्टिप्लेक्स १०० ते १२५ रुपये आणि सिंगल स्क्रीन ४० ते ६० रुपये) आणि प्रेक्षक पुनरावृत्ती सोडली तर सुमारे ३५ ते चाळीस लाखांच्या आसपास प्रेक्षकवर्ग मराठीसाठी सध्यातरी उपलब्ध आहे. गेल्या एकदीड वर्षांत  हा प्रेक्षकवर्ग लाभलेले केवळ दोनच चित्रपट आहेत. याच सूत्रानुसार पंधरा ते वीस लाख प्रेक्षकसंख्या लाभलेले चार चित्रपट आणि पाच ते दहा लाख प्रेक्षकवर्ग लाभलेले चारच चित्रपट आहेत. म्हणजेच चित्रपटगृहांत लाभणारा प्रेक्षकवर्ग हा सध्यातरी मर्यादित याच स्वरूपात आहे.

दाक्षिण्यात फिल्म इंडस्ट्रीत जशी एकी आहे तशी मराठीत नाही. त्यामुळे आम्ही एक-दोन महिने आधीपासून तारीख जाहीर करूनदेखील त्याचा  उपयोग झाला नाही. चित्रपट प्रदर्शनाचे व्यवस्थापन नियंत्रण करणारी व्यवस्था हवी.
जयंत लाडे, निर्माता, पेइंग घोस्ट  

एका आठवडय़ात फार फार तर दोन चित्रपट प्रदर्शित होणं हे संयुक्तिक वाटते. पण पुरेसा अवधी असेल तर त्यापेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शनाचे प्रसंग सामंजस्याने चर्चा करून टाळता येतील हे मात्र निश्चितच.
देवदत्त कपाडिया, निर्माता – धुरंधर भाटवडेकर

चार चित्रपटांमुळे प्रेक्षकांना चॉइस जास्त राहील. ज्याचा कंटेट चांगला असेल तो सिनेमा आघाडी घेईल. पण प्राइम टाइम कोणाला द्यायचा हा मुद्दा मात्र ऐरणीवर येणार आहे. तो एक वादाला आमंत्रण देणारा मुद्दा असेल.
हिमांशू पाटील, निर्माता – प्राइम टाइम

एकाच वेळी चार चित्रपट प्रदर्शित  होणे हे एक प्रोफेशनल हॅझर्ड आहे असेच म्हणावे लागेल. शहरात हिंदीची स्पर्धा तर राहणारच आहे. ज्या अपेक्षित स्क्रीन्स आहेत त्या आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे.
नीलेश नवलखा, निर्माता – सिद्धांत

एका वेळी अधिक चित्रपट प्रदर्शित होणं हे नक्कीच हानीकारक आहे. त्यामुळेच यावर नियमावली करण्याचा विचार चालू आहे. चित्रपटाचे काम सुरू झाल्यावरच प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यास बरे होईल.
विजय पाटकर, अध्यक्ष अ.भा. चित्रपट महामंडळ