Romantic Movies On Amazon Prime Video : तुम्हाला ओटीटीवर रोमँटिक चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला पाच रोमँटिक चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. हे चित्रपट कधी कधी तुम्हाला हसवतील, कधी कधी तुम्हाला रडवतील, परंतु शेवटी ते तुमच्या हृदयात एक खास स्थान मिळवतील. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेल्या अशाच अग्रगण्य ५ चित्रपटांची नावं जाणून घेऊयात.

रब ने बना दी जोडी

‘रब ने बना दी जोडी’ ही सुरिंदर साहनी नावाच्या एका सामान्य माणसाची कथा आहे, जो आपल्या पत्नीचे मन जिंकण्यासाठी एक नवीन लूक स्वीकारतो. या चित्रपटात शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. अनुष्का शर्माने या चित्रपटातून पदार्पण केले. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाने ११ पुरस्कार जिंकले आणि आणि त्याचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते. ‘रब ने बना दी जोडी’ हा शाहरुख खानच्या सर्वोत्तम रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे.

ऐ दिल है मुश्किल

या रोमँटिक ड्रामा चित्रपटात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चननेही भूमिका साकारली होती. करण जोहरचा चित्रपट त्यातील हृदयस्पर्शी संवाद, जबरदस्त संगीत व उत्कृष्ट अभिनय यांसाठी ओळखला जातो. हा चित्रपट प्रेम, मैत्री व त्याग यांची विविध रूपे सुंदरपणे दाखवतो.

दम लगा के हैशा

हा चित्रपट एका वेगळ्या प्रकारची प्रेमकथा आहे, ज्यामध्ये शारीरिक सौंदर्यापेक्षा भावनिक संबंधांवर भर दिला गेला आहे. ही कथा एका तरुणाभोवती फिरते, ज्याला एका जाड स्त्रीशी लग्न करण्यास भाग पाडले जाते. असे घडले तरी हळूहळू दोघांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेम फुलते; परंतु सुरुवातीला दोघांचे एकमेकांशी पटत नाही. आयुष्मान खुरानाने त्यात मुख्य भूमिका साकारली होती. भूमी पेडणेकरने या रोमँटिक चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने २८ पुरस्कार जिंकले.

जब वी मेट

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा एक अतिशय लोकप्रिय व हृदयस्पर्शी हिंदी रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. शाहिद कपूर आणि करीना कपूर खान अभिनीत हा चित्रपट अजूनही बॉलीवूडमधील सर्वोत्तम रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आदित्य कश्यपपासून सुरू होते, जो त्याच्या प्रेमभंगानंतर एकटा पडतो आणि मग त्याला ट्रेनमध्ये गीत नावाची एक गोड, बोलकी व आनंदी मुलगी भेटते.

वीर-झारा

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचेही दर्शन झाले होते. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. शाहरुख खाननं या चित्रपटामध्ये एका भारतीय नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, ज्याला अनेक वर्षं पाकिस्तानमध्ये तुरुंगात ठेवण्यात आलेलं.